फक्त परीक्षेला हजर राहा, पास आम्ही करून देऊ!
बीड : संगणक टंकलेखनाचा संस्थाचालकांनी बाजार मांडल्याचे समोर आले आहे. २० हजार रुपये दिल्यानंतर पास करण्याची १०० टक्के गॅरंटी दिली जात आहे. तीन विषयांसाठी १४ हजार रुपये, तर ६ हजार रुपये हे केवळ प्रशासन, केंद्रप्रमुख, बैठे पथक आणि भेट देणारी यंत्रणा मॅनेज करण्यासाठी दिले जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
त्यामुळेच टंकलेखन परीक्षेत सर्रासपणे डमी विद्यार्थी बसविले जात असल्याचे उघड झाले. ‘लोकमत’ने हा प्रकार चव्हाट्यावर आणल्यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याचा अहवाल मागविला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत संगणक टंकलेखन परीक्षा घेतल्या जात आहेत; परंतु बीडमध्ये डमी विद्यार्थी बसवून परीक्षा दिल्या जात असल्याचे समोर आले होते. हा सर्व प्रकार ‘लोकमत’ने मंगळवारी चव्हाट्यावर आणला होता. त्यानंतर प्रशासन जागे झाले; परंतु या शिक्षणाचा सर्वत्र बाजार मांडल्याचे दिसत आहे. संस्थाचालक हे विद्यार्थ्यांकडून १५ ते २० हजार रुपये वसूल करत असल्याचे सांगण्यात येत आहे. नियमाप्रमाणे टंकलेखनासाठी नियमित उपस्थिती असणे आवश्यक आहे; परंतु हे संस्थाचालक हजेरी ‘मॅनेज’ करून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवितात. तसेच परीक्षा केंद्रातही केवळ नाव नोंद करेपर्यंतच परीक्षार्थी बसविले जातात. त्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला मूळ परीक्षार्थीला बाजूला करून डमी परीक्षार्थी बसविले जात आहेत. यामध्ये लाखो रुपयांची उलाढालही होत आहे.
अशी आकारली जाते फी?
मराठी ३०, इंग्रजी ३०-४० अशा तीन विषयांसाठी प्रतिमहिना, प्रतिविषय ७०० रुपये शुल्क संस्थाचालक आकारतात. त्याप्रमाणे सहा महिन्यांच्या एका विषयासाठी ४ हजार ७०० रुपये घेतले जातात. यात परीक्षा शुल्क हे केवळ ५०० रुपये असते. हे शुल्क नियमित सराव करणाऱ्यांसाठी आहे, तर केवळ परीक्षांसाठी येणाऱ्यांकडून प्रति विषय २ हजार रुपये जास्तीचे घेतले जातात. यामध्ये १ हजार रुपये संस्थाचालकाचे आणि १ हजार रुपये बाकी प्रशासकीय यंत्रणा मॅनेज करण्यासाठी वाटप केले जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
स्पॉट व्हिजिट करून वस्तुनिष्ठ चौकशी करून सर्व अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिलेले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
– अजित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.