ब्रिटिशकालीन सेंट्रल जेलमध्ये कैद्यांमध्ये राडा
नाशिक : नाशिकच्या नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातील काही कैद्यांमध्ये राडा झाल्याची बाब समोर आली आहे.
यामध्ये एक कैदी जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याच्या डोक्याला आणि डोळ्याच्या भोवती मार लागला आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून खळबळ उडाली आहे. एकूणच नाशिकरोड कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे उपचारासाठी कैद्याला घेऊन जात असतांना हा हल्ला झाल्याने कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे.
नाशिक शहरातील नाशिररोड परिसरात मध्यवर्ती कारागृह आहे. खरंतर हे कारागृह ब्रिटिशकालीन आहे. याच कारागृहात राज्यातील विविध भागातील गुन्हेगार शिक्षा भोगत आहे. दरम्यान, विविध ठिकाणचे कैदी एकत्र आल्याने अनेकदा हाणामारी झाल्याचे समोर आले आहे.
आत्ता समोर आलेली बाबही चर्चेचा विषय ठरली आहे. उपचारासाठी जात असेलेल्या कैद्याला दोघा कैद्यांनी पाठीमागून येऊन डोक्यात आणि डोळ्यावर फरशी मारून फेकली आहे. त्यात तो कैदी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला अमिन शमिन खान उर्फ मुर्गी हा कैदी काही महिन्यांपासून आजारी आहे. त्याला उपचारासाठी घेऊन जात असतांना त्याच्यावर दोन कैद्यांनी हल्ला केला आहे.
उपचारासाठी खरंतर शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यापूर्वी भोजनालयाच्या मुंची समोर आला होता. त्याच वेळी त्याच्या पाठीमागून हुसेन फिरोज शेख आणि तेश अनिल गांगुर्डे या दोघांनी येत हल्ला केला.
फरशी फेकून मारली, त्यात डोक्याला आणि डोळ्याच्या बाजूला मोठी दुखापत झाली आहे. या हल्ल्यात मुर्गी राजा हा गंभीर जखमी झाला नी बेशुद्ध पडला, त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या संपूर्ण घटनेनंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात अमिन शमिन खान याच्या तक्रारीवरुन मारहाण करणाऱ्या कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस याबाबत अधिकचा तपास करीत आहे.
दरम्यान, नाशिकच्या कारागृहात नेहमी कैद्यांमध्ये हाणामारी होत असल्याने कारागृहातील अधिकारी कर्मचारी यांच्या कामावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. एकूणच कारागृहाची सुरक्षा रामभरोसे असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.