Social Viral Newsताज्या बातम्याव्हिडिओ न्युज

अंबड पंचायत समितीत सावळा गोंधळ घरकुल लाभार्थ्यांची ससेहोलपट,पत्रकाराला अरेरावी नेमके प्रकरण काय ?


अंबड पंचायत समितीत कर्मचाऱ्याची पत्रकाराला अरेरावी, “तुझ्यासारखे १० पत्रकार खिशात घेऊन फिरतो

 

जालना : अंबड येथील पंचायत समितीमधील घरकुल योजनेच्या भोंगळ कारभारावर ‘लोकआत्मा न्यूज चॅनल’चे संपादक तरंग कांबळे हे लाईव्ह बातमी करत असताना, एका कर्मचाऱ्याने त्यांना “तुझ्यासारखे दहा पत्रकार मी रोज खिशात घेऊन फिरतो, तू कसला पत्रकार,” अशा एकेरी भाषेत दमदाटी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला असून, संबंधित मुजोर कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

जालना जिल्ह्यातील अंबड पंचायत समितीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून घरकुल लाभार्थ्यांना कामाच्या चेकसाठी वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. अनेकदा कार्यालयातील इंजिनिअर आणि संबंधित कर्मचारी जागेवर हजर नसल्याने लाभार्थ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

 

याच नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी आणि कार्यालयात कर्मचारी ओळखपत्र (आय कार्ड) घालतात की नाही, हे तपासण्यासाठी ‘लोकआत्मा न्यूज चॅनल’चे संपादक तरंग कांबळे हे दिनांक ०९/१०/२०२८ रोजी पंचायत समिती कार्यालयात लाईव्ह वार्तांकन करण्यासाठी गेले होते.

 

“आय कार्ड कुठे आहे?” विचारताच कर्मचारी भडकला
कार्यालयातील खोली क्रमांक १० मध्ये (महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान कक्ष) बसलेले रोहयो विभागातील कर्मचारी शाम डोंगरे (रा. मानदेऊळगाव, ता. अंबड) यांना कांबळे यांनी लाईव्ह दरम्यान “साहेब, तुम्ही आय कार्ड का घातले नाही?” अशी विचारणा केली. त्यावर डोंगरे यांनी “मी आय कार्ड बनवले नाही,” असे उत्तर दिले.

कांबळे यांनी विनंती करत, “आपण आयडी कार्ड घातल्यास नागरिकांना आपण कर्मचारी आहात हे कळेल,” असे म्हटले. यावर शाम डोंगरे यांचा पारा चढला आणि त्यांनी अत्यंत उर्मट भाषेत कांबळे यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली.

 

कर्मचाऱ्याची भाषा: “माझं नाव शाम डोंगरे आहे, मांगदेळगावचा. तुला ऐकू आलं नाही का? तू मला भाषा शिकवणारा कोण? तुझ्यासारखे १० पत्रकार मी रोज खिशात घेऊन फिरतो. जास्त हुशारी करू नकोस, तुला समजून सांगतोय नीट राहा,” अशा आक्रमक शब्दांत डोंगरे यांनी पत्रकाराला धमकावले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

 

व्हिडिओ येथे पहा !

 

स्थानिक आमदाराचा नातेवाईक असल्याची चर्चा
संबंधित कर्मचारी हा एका आमदाराचा नातेवाईक असल्यामुळेच त्याची मगरुरी वाढली असून, तो सामान्य नागरिकांशीही अशाच प्रकारे वागत असावा, असा आरोप आता केला जात आहे. जर लोकांचा आवाज मांडणाऱ्या पत्रकाराला अशी वागणूक मिळत असेल, तर सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील, असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे.

मुजोर कर्मचाऱ्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी संपादक तरंग कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वरे केली आहे. या घटनेमुळे पंचायत समितीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button