जालन्यात जेसीबी चोरट्यांच्या पोलीसांनी 12 तासात आवळल्या मुसक्या, 46 लाखाचा मुद्देमाल जप्त
जेसीबी चोरी करणाऱ्या चार अज्ञात चोरांना 12 तासात ताब्यात घेऊन चोरी झालेली जेसीबी व चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन कार असा 46 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. जालन्यातील सदर बाजार डी. बी. पथकाने ही कारवाई केली आहे.
जालना शहरातील कन्हैय्यानगर येथून 26 फेब्रुवारी रोजी रस्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणाहून जे.सी.बी. चोरी झाल्याची घटना घडली होती. संदीप किसनराव नाईकवाडे रा. गोपीकिशन नगर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करुन तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्याकडे देण्यात आला होता.
26 फेब्रूवारी रोजी गुन्हयाच्या तपासादरम्यान आरोपींचा शोध घेत असतांना चिखली, जि. बुलढाणा येथून आरोपी शेख मोहम्मद शेख बशार रा.मु.पो. एकलारा, ता. चिखली जि.बुलढाणा यास ताब्यात घेतले व त्याकडे पोलीसांनी चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार आरोपी सागर हरिश्चंद्र बांजाळ, रा.मु.पो. बोरगाव काकडे, ता. चिखलो जि. बुलढाणा, दिपक मुरलीधर मांजरे रा.मु.पो. बोरगाव काकडे, ता. चिखली जि. बुलढाणा, नारायण अशोक दळवी, रा. एकलारा, ता. चिखली जि.बुलढाणा यांचेसह गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेतले व गुन्हयात चोरी गेलेलो जे.सी.बी. व. चोरी करण्यासाठी वापरत असलेल्या फोर्ड इकोस्पोर्ट, मारुती अल्टो कार असा एकुण 46 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर, पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, डी. बी. पथकाचे पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुभाष पवार, धनाजी कावळे, इरशाद पटेल, जगन्नाथ जाधव, सोमनाथ उबाळे, मनोहर भूतेकर, सागर बाविस्कर यांनी केली आहे.