हृदयद्रावक! दहावीची परीक्षा संपल्याने मित्रांसोबत खेळायला गेला होता सत्यम; तिथेच झाला दुर्दैवी अंत
पाटणा 28 फेब्रुवारी : बिहार राज्यातील छपरा जिल्ह्यातील मांझी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या मुलानं नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती सत्यम धर्मेंद सिंह असं मयताच नाव आहे. सोमवारी (27 फेब्रुवारी 2023) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. दहावीची परीक्षा संपल्यानंतर सत्यम त्याच्या मित्रांबरोबर खेळण्यासाठी नदीकाठी गेला होता. खेळताना या मुलांचा बॉल नदीत गेला.
तो बॉल नदीतून काढण्याच्या नादात सत्यमला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर सत्यमच्या कुटुंबावर शोककळा पसरलीय. त्याची आई पुष्पा देवी, वडिल धर्मेंद्र सिंह आणि काका पीएसीएसचे अध्यक्ष नागेंद्र सिंह यांना या घटनेमुळे मोठा धक्का बसलाय. हे सर्वजण दुर्गापूरचे रहिवासी आहेत.
पुष्पा देवी व धर्मेंद सिंह यांना तीन मुलं असून, त्यामधील सत्यम सर्वांत लहान होता. सत्यम नदीत बुडाल्याची बातमी समजताच गावात खळबळ उडाली. आजूबाजूच्या गावातील शेकडो लोक नदीच्या काठावर जमले. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सत्यम त्याच्या काही मित्रांसोबत नदीकाठावर खेळण्यासाठी गेला होता.
या वेळी खेळताना त्यांचा बॉल नदीत पडला. हा बॉल पकडण्याच्या प्रयत्नात सत्यमनं नदीत उडी मारली, व तो बॉल पकडण्याच्या प्रयत्नात नदीमध्ये बुडू लागला. सत्यमला बुडताना पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरडा सुरू केला. नदीजवळील शेतात काम करणारे काहीजण मुलांचा आवाज ऐकून नदीजवळ धावत आले.
त्यांनी सत्यमला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही. त्यानंतर त्यांनी गावातील लोकांना याची माहिती दिली. माहिती मिळताच ग्रामस्थही नदीजवळ पोहोचले, आणि त्यांनी नदीमध्ये सत्यमचा शोध घेतला. त्याला नदीतून बाहेर काढून ग्रामस्थांनी मांझी येथील आरोग्य केंद्रात नेलं, तेथील डॉक्टरांनी सत्यमला तपासून छपरा येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितलं.
त्यानुसार छपरा येथील हॉस्पिटलमध्ये नेलं असता, डॉक्टरांनी सत्यमला तपासून मृत घोषित केलं. दरम्यान, या घटनेनं संपूर्ण दुर्गापूर परिसरात शोककळा पसरली आहे. नदीमध्ये बुडून सत्यमचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्ती केली जातेय. त्याच्या कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न परिसरातील नागरिकांकडून करण्यात येतोय. दुसरीकडे, नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं या घटनेचा सत्यमची आई पुष्पा देवी यांना खूप मोठा मानसिक धक्का बसलाय. गावातील महिलांकडून त्यांना धीर दिला जातोय. सध्या पंचक्रोशीमध्ये या घटनेची चर्चा सुरू आहे.