देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश; आरोपीस ठोकल्या बेड्या
वर्धा : शेतातील एका झोपडीत सुरु असलेला देहविक्रीचा व्यवसायाचा सावंगी पोलिसांनी पर्दाफाश केला असून पीडित महिलेची सुटका करुन आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.ही कारवाई नागठाणा परिसरात सावंगी पोलिसांनी २७ रोजी रात्री उशिरा केली. पोलिसांनी झोपडीला सील ठोकले. सावंगी पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे परिसरात देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.जीवन दत्तू मोहर्ले रा. रोठा वेणी ता. कळंब, जि. यवतमाळ ह.मु. सावंगी परिसर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, नागठाणा परिसरातील एका शेतात असलेल्या टिनपत्राच्या झोपडीत देहविक्री व्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक तेथे पाठविला. आरोपी जीवन याने वर्धा येथील रहिवासी एका ३३ वर्षीय महिलेला तेथे बोलावून बनावट ग्राहकास वेश्या व्यवसाय करण्यास उपलब्ध करुन दिले.
आरोपी जीवन पीडित महिलेला स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी देहविक्री करण्यास प्रवृत्त करीत असल्याचे पुढे आले. अखेर सावंगी पोलिसांनी घटनास्थळी जात आरोपीला देहविक्रीचे पैसे घेताना रंगेहात पकडले. तसेच पीडित महिलेची सुटका केली. सावंगी पोलिसांनी रात्री उशिरा आरोपीला अटक करुन त्याच्याविरुद्ध कलम ४,५,७ अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक मल्हारी ताळीकोटे, सतीश दरवरे, प्रशांत वंजारी, श्रावण पवार, पंचटिके, महिला पोलिस कर्मचारी ठाकरे, मीना माईंदे यांनी केली.