लग्नानंतर तीन महिन्यांतच संपले प्रेम, नवविवाहितेची आत्महत्या; पतीला अटक
प्रेमविवाह करून तीन महिने होत नाही, तोच चारित्र्याच्या संशयावरून मारझोड करणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
भाईंदर पश्चिमच्या मूर्धा गाव सार्वजनिक शौचालयजवळ राहणाऱ्या २० वर्षीय किरण रमेश चव्हाण आणि जवळच राई शिवनेरी येथे राहणारी २० वर्षीय नेहा मोहन दामले यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये एका मंदिरात प्रेमविवाह केला होता. नेहा लग्नानंतर किरणसोबत माहेरी येत-जात होती. तिच्या आईसह कुटुंबीयांचेही नेहाच्या सासरी येणे-जाणे होते, परंतु लग्नाच्या काही दिवसांनीच किरण कामाला जात नाही, कोणाशी फोनवर बोलली तरी संशय घेऊन मारझोड करतो, असे नेहाने आई सविता हिला सांगितले. त्यावर सविताने त्यांची समजूत काढली. जानेवारीत किरण दुचाकी घेऊन आला आणि हप्ता भरायचा म्हणून नेहाच्या वडिलांकडून १० हजार रुपये उसने घेतले. १८ फेब्रुवारीला किरणने सविता यांना कॉल करून नेहा रात्री-अपरात्री कोणाशी, तरी फोनवर बोलते, अशी तक्रार केली असता सविता यांनी दोघांना घरी बोलावून समजावले.
समजूत काढूनही घेतला गळफास
आईने समजूत काढल्याच्या दुसऱ्या दिवशी नेहाने आईला कॉल करून मला घरी घेऊन जा, असे सांगितले. सायंकाळी मात्र नेहाने दरवाजा आतून बंद केल्याचे सविता यांना सांगितले. त्यानंतर काही वेळाने सविता यांनी किरणला विचारणा केली असता नेहाने गळफास घेतल्याचे त्याने सांगितले. तिला भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात नेले असता तिचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सविता यांच्या फिर्यादीवरून भाईंदर पोलिसांनी २० फेब्रुवारीला गुन्हा दाखल करून किरणला अटक केली आहे. मंगळवारी ठाणे न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.