अग्निवीरच्या नियमात मोठा बदल; आता ‘या’ शाखेतील विद्यार्थीदेखील करू शकणार अर्ज
केंद्र सरकारने अग्निवीर भरतीच्या नियमांमध्ये पुन्हा मोठा बदल केला आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी तिन्ही सैन्यात सैनिकांच्या भरतीसाठी अग्निपथ योजना सुरू केली होती यानंतर सरकारने नियमांमध्येही बदल केले आहेत
नव्या बदलानुसार आता आयटीआय-पॉलिटेक्निक पास आउट विद्यार्थीदेखील यासाठी अर्ज करू शकणार आहेत. अग्निपथ भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लष्कराने पात्रता निकष वाढवले असून, ITI- पॉलिटेक्निक पास आउट तांत्रिक शाखेतील विद्यार्थीदेखील यासाठी अर्ज करू शकणार आहेत.
सरकारच्या या निर्णयामुळे पूर्व-कुशल तरुणांना विशेष प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच प्रशिक्षणाचा वेळही कमी होणार असल्याचे केंद्राने म्हटले आहे. या मोठ्या बदलामुळे आता या भरतीमध्ये आणखी उमेदवार सहभागी होतील, असा विश्वास लष्कराला आहे.
16 फेब्रुवारी रोजी भारतीय लष्कराने अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती, त्यानुसार अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरू झाली आहे.
ज्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे ते भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अधिसूचनेनुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2023 आहे. तसेच, यासाठी निवड प्रक्रिया 17 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. 16 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, इयत्ता 10वी उत्तीर्ण उमेदवार अग्निवीर (जनरल ड्यूटी) (सर्व शस्त्र) साठी अर्ज करू शकतात.
तर, अग्निवीर (तांत्रिक) (सर्व शस्त्र) साठी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अग्निवीर लिपिक (स्टोअर कीपर) पदांसाठी किमान 60 टक्के गुणांसह 12वी पास असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतील.
अग्निवीर ट्रेड्समन पदांसाठी 8वी-10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. तर, आता आयटीआय-पॉलिटेक्निक पास आऊट झालेले तरुणही नव्या बदलांनंतर अर्ज करू शकणार आहेत.