गोळीबार करुन चार लाखांची रक्कम लुटली
भोर : पुणे – सातारा महामार्ग लगत खेड शिवापूर येथील सोनल वाईन्समध्ये दिवसभरात जमा झालेली ३ लाख ७८ हजार रुपयांची रोकड जमा करण्यासाठी दुचाकीवरून नेत असताना पाठीमागुन दुचाकीवर येत तीन जणांनी गोळीबार केला व रोकड हिसकावली. ही घटना रविवारी (दि. १९) रात्री पावणेबाराच्या दरम्यान घडली. सदर गुन्ह्याची नोंद राजगड पोलीस ठाण्यात झाली आहे.
पैशांची पिशवी हिसकावून पलायन
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड शिवापूर हद्दीत असणारे सोनल वाईन्स दुकान बंद करून दीपक शंकर जगदाळे (रा. गराडे, ता. पुरंदर), कालेश्वर अगारीया हे दोघे जण पिशवीत ३ लाख ७८ हजार रुपये घेऊन शेजारीच असलेल्या पेट्रोल पंपावर रोकड जमा करण्यासाठी दुचाकीवरुन जात होते. त्याचवेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांच्या दुचाकीला घासत पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी कालेश्र्वर याने विरोध केल्याने चोरट्यांनी पिस्तुलातून दोन वेळा गोळीबार करीत रोकड असलेली पिशवी हिसकावून दुचाकीवरून पलायन केले.
या घटनेची फिर्याद दीपक शंकर जगदाळे (राहणार गराडे, ता. पुरंदर) यांनी दिली असून तीन अज्ञात चोरट्यांविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे करीत आहेत.