माहेरहून पैसे न आणल्याने २७ वर्षीय विवाहितेची हत्या
पुणे : ( आशोक कुंभार ) दुकान आणि कार घेण्यासाठी माहेरहून पैसे न आणल्याने २७ वर्षीय विवाहितेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात चिखली परिसरातील जाधववाडी येथे घडली आहे.
याप्रकरणी पती, सासू आणि सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्वेता प्रवीण जाधव (२७) हिचे २०१७ साली प्रवीण जाधव (३०) याच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना पाच वर्षांचा मुलगा आहे. प्रवीणचे जाधववाडीत किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानासाठी आणि नवी कार घेण्याकरता प्रवीणने तिच्या पत्नीकडे माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. परंतु, तिने पैसे आणण्यास नकार दिला. त्यामुळे तिची सासूही तिचा छळ करू लागली. पैसे आणत नसल्याने तिच्या चारित्र्यावरही संशय घेण्यात आला होता.
दुकान आणि कारसाठी पैसे आणण्याकरता प्रवीणने श्वेताला माहेरी पाठवले होते. मात्र, पैसे न घेताच ती माहेरहून परतली. त्यामुळे संतापलेल्या प्रवीणने तिची ओढणीने गळा आवळून हत्या केली. याप्रकरणात तिचे सासरे काळूराम जाधव आणि सासू प्रमिला जाधव यांचाही हात होता.
ओढणीने गळा आवळ्यानंतर तिचा मृत्यू झाला. मात्र, तिला चक्कर आली असा बनाव रचण्यात आला. त्यामुळे तिला उपचारांकरता डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. परंतु, शवविच्छेदन केल्यानंतर हा नैसर्गिक मृत्यू नसून गळा आवळ्याने मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. त्यामुळे विवाहितेच्या वडिलांनी पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.
जालन्यात होणाऱ्या बायकोची हत्या
जालन्यातील मंठा तालुक्यातील बेलोरा तांडा येथील सपना जाधव (१७) हिचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात वरूड येथील सुशील पवार या तरुणासोबत ठरला होता. या दोघांचा १५ दिवसांपूर्वीच साखरपुडा पार पडला. लग्नाच्या तयारीसाठी दोन्ही कुटुंबीयांनी बोलणी करून शनिवारी बस्ता करण्याचे ठरवले. यासाठी ते लोणार येथे बस्ता बांधण्यासाठी आले. सुशील पवारसुद्धा बस्त्याला आला. मात्र, सपना तेथे आली नव्हती. त्यामुळे सुशील मुलीला भेटण्याकरता बेलोरा तांडा येथे गेला. यावेळी सपना एकटीच घरी होती. त्यामुळे त्याने तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने नकार दिल्याने दोघांमध्ये वादावादी झाली. यातूनच त्याने तिची गळा चिरून हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.