सर्पदंश झालेल्या मुलीचा रुग्णवाहिकेअभावी मृत्यू
नाशिक येवला तालुक्यातील राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका चालक नसल्याने मुलीला उपचारासाठी वेळेत दाखल करता न आल्याने जीव गमवावा लागला.
नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण, बळीराजा हतबल
येथील हनुमान वाघ यांची मुलगी प्रगती हिला दुपारच्या वेळेस सर्पदंश झाल्याने आईने तिला गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्काळ उपचारासाठी आणले. परंतु आरोग्य केंद्र बंद होते व तेथे अॅम्ब्युलन्स चालक उपलब्ध नसल्याने त्यांना मुलीला इतरत्र नेण्यास विलंब होत गेला. अखेर खासगी वाहनाने आईने मुलीला येवला येथे उपचारासाठी नेले. परंतु तेथे जात असताना तिची प्रकृती गंभीर बनली होती. उपचारादरम्यान पहाटे या मुलीचा मृत्यू झाला. यापूर्वीही तीन-चार घटनांत राजापूर आरोग्य केंद्राचा रुग्णवाहिका चालक उपलब्ध नव्हता. त्यामुळे या चालकाला काढण्यात यावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. गैरहजर असलेल्या डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना व तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर दराडे यांनी केली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी भेट दिली असता तेथील अनागोंदीचे दर्शन त्यांना झाले होते. त्यांनी कारवाईची तंबी देऊनही या कर्मचार्यांमध्ये काही सुधारणा झाल्याचे दिसून आले नाही. संपूर्ण केंद्रावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.