महाशिवरात्रीला पुण्यातील तरुणाची अनोखी आराधना,२२ हजार नाण्यांपासून शिवलिंग ..
पुणे : ( आशोक कुंभार ) पुण्यातील काळेपडळ येथील दीपक घोलप या तरूणाने वेगवेगळ्या किंमतीची नाणी वापरुन आकर्षक शिवलिंग बनविलं आहे. २२ हजार ३०१ नाण्यांचा त्यासाठी वापर केला असून गेल्यावर्षी या शिवलिंगाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
जगातलं अशा प्रकारचं हे पहिलंच शिवलिंग असल्याचा दावा या तरूणाने केला आहे. दीपक हा शिवभक्त आहे. तो दररोज नित्यनेमाने शिवमंदिरात दर्शनासाठी जातो.
शिवलिंग प्रतिमा त्याला कायम मोहीत करते. आपण त्यामध्ये काहीतरी वेगळं करावं, या विचारातून त्याला नाण्यांचा वापर करून शिवलिंग बनवण्याची संकल्पना सुचली.
त्याने दोन, पाच, दहा रूपयांची नाणी जमवायला सुरूवात केली. चार महिने परिश्रम घेऊन त्याने अखेर एक आकर्षक शिवलिंग आकारास आणलं.
२२ हजार नाण्यांचा वापर करुन हे शिवलिंग साकारण्यात आलं. यासाठी एकूण ७९ हजार ३०१ रुपयांची नाणी जमा केली होती.
जगात कुणीही संकल्पना राबवली नसेल, असं शिवलिंग बनवण्याची त्यांची इच्छा होती. नाण्यांपासून अशी चांगली कलाकृती होईल, असा विचार करून चार महिने नाणी जमा करून हे आकर्षक शिवलिंग तयार करण्यात आलं आहे.