Video :”नातं हे रक्तानं होत नाही, जो विचारांशी नातं सांगेल, तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी
“बाळासाहेबांमुळे मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली”
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांचं हे सरकार आहे. बाळासाहेबांमुळेच सर्वसामान्य कार्यकर्ता आज मोठ्या पदांवर पोहचला आहे. माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता देखील त्यांच्या विचारांवर प्रभावित होऊन आणि त्यांच्या आर्शीवादामुळे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आज काम करण्याची संधी मिळाली. बाळासाहेबांच्या आठवणींशिवाय एकही क्षण जात नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
बाळासाहेबांचे विचार, त्यांचा आदर आणि त्यांची शिकवण घेऊन आम्ही सरकार चालवत आहोत. सर्व योगदान बाळासाहेबांचं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे बाळासाहेबांची किर्ती देशातच नाही तर जगभरात पसरली आहे. अशा या व्यक्तिमत्वाचं तैत्रचित्राचं आज विधानभवनात अनावरण होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी माध्यमाशी बोलताना दिली.
हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आम्हाला सदैव लाभत राहो…#BalasahebThackeray pic.twitter.com/3rV4I4cT5k
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 23, 2023
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. जयंती साजरी करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये चढाओढ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील शिवसेना भवन चारही बाजूंनी रंगीबेरंगी रोषणाईने सजले आहे. राजकारणातील विविध नेते त्यांना अभिवादन करत आहेत. याच दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विनम्र अभिवादन केलं आहे,
देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. “हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आम्हाला सदैव लाभत राहो.” असं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंना देखील टोला लगावला आहे. “बाबासाहेबांशी नातं हे रक्तानं होत नाही, जो विचारांशी नातं सांगेल, तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल” असं म्हणत फडणवीसांनी जोरदार निशाणा साधला आहे.
“ज्या विचारांनी बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली, तो विचार मोडू दिला जाणार नाही”
“बाबासाहेबांशी नातं हे रक्तानं होत नाही, ते विचारांनी करावं लागतं. विचारांशी नातं हे बाळासाहेबांशी खरं नातं आहे. जो जो विचारांशी नातं या ठिकाणी सांगेल, तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल. बाळासाहेबांना मानवंदना देताना आपण हा निर्धार करूया, ज्या विचारांनी बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली, तो विचार मोडू दिला जाणार नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.