ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव जन्मस्थळी छगन भुजबळ यांच्या कडून विनम्र अभिवादन


ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव जन्मस्थळी छगन भुजबळ यांच्या कडून विनम्र अभिवादन

पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज,फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित अभ्यासक्रम आखण्यात यावे – छगन भुजबळ

पुणे विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले पुतळ्याच्या परिसरात चित्रशिल्पांचे स्मारक लवकरात लवकर उभारा- छगन भुजबळ

राज्यातील प्रत्येक शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच पूजन झालचं पाहिजे – छगन भुजबळ

फुले, शाहू, आंबेडकर यांनी केलेल्या कार्यानुसार आपल्या राज्याचा कारभार होण्याची आवश्यकता आहे. त्यांचे विचार समाजात रुविण्यासाठी पुणे विद्यापीठात त्यांच्या विचारांवर आधारित अभ्यासक्रम आखण्यात यावे. सावित्रीबाई फुले पुतळ्याच्या परिसरात चित्रशिल्पांचे स्मारक करण्यात यावेत. तसेच राज्यातील प्रत्येक शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झालचं पाहिजे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंती निमित्त त्यांच्या जन्मगावी नायगाव येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय स्त्री मुक्ती दिन, महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई, सहकार व इतरमागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, विजय शिवतारे, आमदार मकरंद पाटील,मंजिरी धाडगे, सरपंच साधना नेवसे, उपसरपंच वैभव कांबळे, राजेंद्र नेवसे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकर ही आपल्या सर्वांची दैवंत आहे. त्यांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. शासनाने त्यांच्या विचारांवर आधारित राज्यकारभार करण्याची नितांत आवश्यकता आहे. ज्या पुणे विद्यापीठात अथर्वशीर्ष विषय अभ्यास क्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. त्या विद्यापीठात या महापुरुषांच्या विचारांवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्याची नितांत आवश्यकता आहे. सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्यात आले आहे. याठिकाणी त्यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याच्या परिसरात त्यांच्या चित्रशिल्पांचे स्मारक करण्यात यावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबधितांना सूचना द्यावात अशी मागणी त्यांनी केली.

ते म्हणाले की, स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य हे अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यासाठी आपण त्यांच्या जयंतीदिनी महिला शिक्षण दिन साजरा करत आहोत. या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे राज्यातील प्रत्येक शाळेत पूजन झालेच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तसेच अनेक दिवसांपासून महात्मा फुले यांच्या चित्रपटाचे काम रखडले आहे. ते लवकरात लवकर करण्यात येऊन ओबीसीसाठी विविध योजना राबविण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले. तसेच भिडे वाड्यातील स्मारकाचा तसेच पुण्यातील फुले वाडा विस्तारीकरण कामांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. तसेच ही कामे लवकरत लवकर पूर्ण करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्याकडे केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी वर्गाच्या प्रलंबित मागण्यांवर लवकरच मार्ग काढू आणि महात्मा फुले चित्रपटाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button