पत्नीच्या अंगावर साप सोडला व विषारी इंजेक्शन्सही दिली पत्नी बचावल्यानं आरोपीचं बिंग फुटलं
मुंबई : माणसांमधली विकृती उघड करणारी एक घटना मध्य प्रदेशात घडली. मंदसौर जिल्ह्यातल्या 2 पत्नी असणाऱ्या एका व्यक्तीने एका पत्नीच्या अंगावर साप सोडला व विषारी इंजेक्शन्सही तिला दिली.
पत्नीचा साप चावून मृत्यू झाल्याच्या कारणाखाली सरकारकडून 4 लाख रुपयांची आर्थिक मदत लाटण्याचा नवऱ्याचा प्रयत्न होता; मात्र त्याचा डाव उघडकीला आला व पोलिसांनी त्याला पकडलं. मध्य प्रदेश राज्यातल्या मंदसौर जिल्ह्यातली ही घटना 5 महिन्यांपूर्वीची आहे. मंदसौरच्या यशोधर्मन नगर ठाणे क्षेत्रातल्या माल्या खेडी गावातल्या हलिमा हिची हत्या करण्याचा प्रयत्न तिचा नवरा मोमीन यानं केला. मोमीन 2013मध्ये एनडीपीएसच्या एका आरोपाखाली जोधपूरच्या जेलमध्ये होता.
तेव्हा त्याचं लग्न शानू बी हिच्यासोबत झालं होतं
जेलमध्ये असताना शानू बी घर सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली. मोजीम यानं 2015मध्ये हलिमा हिच्याशी लग्न केलं.
काही दिवसांनंतर पहिली बायको शानू बी हिने पुन्हा मोजीमला फोन करायला सुरुवात केली. मोजीम आणि शानू बी यांच्यात पुन्हा जवळीक वाढली व मोजीमने शानू बीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. पहिल्या बायकोशी लग्न करण्यासाठी मोजीमने हलिमासोबत वादावादी सुरू केली. तिला घरातून हाकलून देण्याचाही प्रयत्न केला; मात्र हलिमाला संसार तोडायचा नव्हता.
नवरा पुन्हा नीट वागायला लागेल अशी तिला आशा होती. त्यामुळे ती त्याचा छळ सहन करत राहिली; मात्र मोजीमने एके दिवशी हलिमाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. काही मित्रांच्या मदतीनं साप अंगावर सोडून हलिमाला मारण्याचा त्याचा डाव होता; मात्र हलिमा बचावली. ‘माझा नवरा पहिल्या बायकोसोबत बोलत होता.
त्याला तिच्यासोबत राहण्याची इच्छा होती; पण मला कुटुंब तोडायचं नव्हतं. मी त्यांना समजावलं; पण त्यांनी मला साप चावून मारण्याचा प्रयत्न केला. मी शेजाऱ्यांकडे मदत मागितली आणि वडिलांना बोलावून घेतलं. आता नवऱ्याला कठोर शिक्षा व्हावी असं वाटतं,’ असं हलिमा सांगते.
हलिमाचे वडील मोहम्मद सादिक सांगतात, ‘मुलीला साप चावल्याचं शेजाऱ्यांनी फोन करून सांगितलं. तिच्यावर लगेचच उपचार करा असंही ते म्हणाले. गावात मुलीवर उपचार केले; पण परिस्थिती गंभीर होत चालली होती. म्हणून मग उदयपूरच्या कनक रुग्णालयात घेऊन गेलो.
आरोपीला आता कठोर शासन व्हावं अशी इच्छा आहे.’ आरोपीने पत्नीवर विषारी साप सोडून मारण्याचा प्रयत्न केला, असं तपास अधिकारी विनय बुंदेला यांनी सांगितलं. पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीवरून आरोपी मोमीन आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दोन वेळा साप चावून व विषारी इंजेक्शन देऊनही पत्नी हलिमा बचावल्यानं आरोपीचं बिंग फुटलं. पत्नीचा साप चावून आकस्मिक मृत्यू झाल्याचा दावा करून 4 लाखांची सरकारी मदत घशात घालण्याचा प्रयत्नही आरोपी करणार होता; मात्र त्याचा तो डावही फसला.