एका शेतकऱ्याने तब्बल 205 किलो कांदे विकल्यानंतर पण शेवटी त्याच्याकडे फक्त 8 रुपये
अतिवृष्टी, दुष्काळ यासारख्या संकटांना शेतकऱी नेहमीच तोंड देत असतो. शेतमालाच्या किमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळतात. मालाला भाव न मिळणे ही शेतकऱ्यांची मोठी समस्या आहे. अशीच एक डोळे पाणावणारी गोष्ट आता समोर आली आहे.कर्नाटकमधील एका शेतकऱ्याने तब्बल 205 किलो कांदे विकल्यानंतर पण शेवटी त्याच्याकडे फक्त 8 रुपये शिल्लक राहिले आहेत. शेतकऱ्याशी घडलेल्या या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
शेतकऱ्याला पैसे मिळाल्याच्या पावतीचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघ़डकीस आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकमधील गडगमधील पावडेप्पा हल्लीकेरी नावाच्या शेतकऱ्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला. त्याने बंगळुरूच्या यशवंतपूर येथील बाजारात 205 किलो कांद्याची विक्री करण्यासाठी तब्बल 415 किलोमीटरचा प्रवास केला. मात्र एवढा कांदा विकून देखील शेतकऱ्याच्या हातात शेवटी फक्त 8.36 रुपये शिल्लक राहिले आहेत.
शेतकऱ्याच्या कांद्याला प्रति क्विंटल 200 रुपये भाव मिळाला. त्यात मालवाहतुकीचे 377 रुपये कापण्यात आले. त्यानंतर हमालीचे 25 रुपये कापण्यात आले. शेवटी शेतकऱ्याच्या हातात फक्त 8.36 रुपये शिल्लक राहिले. शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. याच कारणामुळे येथील शेतकरी सरकारविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. या शेतकऱ्यांकडून हमीभावाची मागणी केली जात आहेत.
पावडेप्पा हल्लीकेरी यांनी पुणे, तामिळनाडूमधून अनेक शेतकरी हे आपला माल यशवंतपूर येथे घेऊन येतात. येथे मालाला चांगली किंमत मिळते. पण आम्ही इतक्या कमी किमतीची आशा केली नव्हती. मला फक्त आठ रुपये मिळाले. इतर शेतकरी यशवंतपूर बाजारातील या गोष्टीपासून सतर्क व्हावे म्हणून मी सोशल मीडियावर ही पावती पोस्ट केली. तेथे शेतमालाला योग्य किंमत मिळत नाही. मी शेतात हे पीक घेण्यापासून ते बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी तब्बल 25 हजार खर्च केल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.