बोरी-अंबेदरी धरणाच्या बंदिस्त कालवा कामाच्या भूमिपूजनासाठी गेलेल्या पालकमंत्री दादा भुसे यांना दाखवले काळे झेंडे
बंदिस्त कालव्यामुळे आमच्या शेतास पाणी मिळणे दुर्लभ होईल,असा आक्षेप घेत माळमाथ्यावरील दहिदी,टिंगरी परिसरातील शेतकरी आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. रविवारी बोरी-अंबेदरी धरणाच्या बंदिस्त कालवा कामाच्या भूमिपूजनासाठी गेलेल्या पालकमंत्री दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवत संतप्त शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.
भुसे यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील बोरीअंबेदरी व दहिकुटे या लघुपाटबंधारे प्रकल्पांच्या बंदिस्त कालव्याद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे २५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पारंपारिक कालव्याऐवजी बंदिस्त कालव्यामुळे पाण्याची बचत होऊन माळमाथ्यावरील झोडगे परिसरातील दुष्काळप्रवण गावांपर्यंत पाणी पोहोचण्यास मदत होईल,असा भुसे यांचा विश्वास आहे. त्याच अनुषंगाने मंजूर झालेल्या या दोन्ही प्रकल्पांच्या बंदिस्त कालवा कामांचे भूमिपूजन रविवारी आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी गेलेल्या भुसे यांना संतप्त शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत बंदिस्त कालव्यांना जोरदार विरोध दर्शविला. तसेच स्थानिकांना विश्वासात न घेता हे काम रेटण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार करत निषेधाचा सूर या शेतकऱ्यांनी लावला. या कालव्यामुळे शेती सिंचनाखाली येईल या उद्देशाने आम्ही जमिनी दिल्याचे सांगत राज्यातील सर्वच सिंचन प्रकल्पांमध्ये पारंपारिक पद्धतीचे कालवे असताना आमच्या भागात बंदिस्त कालव्याचा अट्टाहास का असा सवाल या शेतकऱ्यांनी केला आहे.