बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी जीन्स वापरावर बंदी घालणारा आदेश काढल्याने नवा वाद
बीड : बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी एक आदेश काढून वाद निर्माण केला आहे. कार्यालयातील पोशाखाबाबत त्यांनी टी-शर्ट सोबत जीन्स वापरावरही बंदी घातली आहे.
यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. हा आदेश स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याची भूमिका घेण्यात आली आहे. याबाबत मॅग्मो संघटना आवाज उठवणार असल्याचे मॅग्मोचे कार्याध्यक्ष डॉ.नितीन मोरे यांनी इशारा दिला आहे. आरोग्य विभागाच्या आयुक्त पदाचा कारभार तुकाराम मुंढे यांनी स्विकारला.
शिस्तप्रीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. ते रूजू होताच त्यांनी डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना केल्या. तसेच एका बैठकीत कार्यालयीन पोशाखाचाच वापर करावा, असे सांगितले. याच अनुषंगाने बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी 30 ऑक्टोबर रोजी एक आदेश काढला आहे.
यात त्यांनी कर्तव्यावर असताना टी-शर्ट, जीन्सचा वापर करू नये, असे म्हटले आहे.
मात्र शासनाचा आदेश हा केवळ टी-शर्ट वापरू नये असे स्पष्ट म्हटले आहे. असे असतानाही बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी जीन्स वापरावर बंदी घालणारा आदेश काढल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटनेकडून या प्रकाराबाबत निवेदन देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.