जर्मनीच्या म्युनिक शहरात ढोल ताशाच्या गजरात, लेझीम खेळत थाटामाटात गणेशोत्सव साजरा
गणेशोत्सव साजरा केला जातोय. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र, गणोशोत्सवाचा हा उत्साह फक्त भारतातच नाही तर सातासमुद्रापार थेट जर्मनीपर्यंत (Germany) पोहोचला आहे. महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या वतीने जर्मनीत ढोल ताशाच्या गजरात, लेझीम खेळत थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातोय.
जर्मनीच्या म्युनिक शहरात कोरोनाच्या दोन वर्षानंतर पुन्हा एकदा वाजत गाजत बाप्पा विराजमान केला आहे. महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या वतीने जर्मनीत राहून सुद्धा गणेशोत्सवा सारखा मराठी सण अगदी उत्साहात साजरा करता यावा यासाठी 2016 पासून हा प्रयत्न केला जात आहे. अगदी महाराष्ट्रात ज्या उत्साहात ढोल-ताशा वाजवत, लेझीम खेळत बाप्पाची मिरवणूक काढून हा बाप्पा विराजमान केला जातो. अगदी तशाच प्रकारे जर्मनीत राहून या मंडळाने गणराज विराजमान केला आहे.
या गणेशोत्सवात फक्त महाराष्ट्र किंवा भारतीय नागरिक नाही तर जर्मनीतील स्थानिकसुद्धा उत्सुकतेपोटी आणि हा उत्साह पाहून सहभागी झाले आहेत. या मंडळात रोज 500 ते 1000 पेक्षा अधिक महाराष्ट्रीय त्यासोबतच जर्मनीमधील स्थानिक या मंडळात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले आहेत.
म्युनिक शहराच्या मध्यवर्ती भागात गणेशोत्सव साजरा :
म्युनिक शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ओडियनस्प्लाज या भागात मुख्य मिरवणूक निघाली होती. या ठिकाणी अनेक भाविक दर्शनासाठी आले. यावेळी जर्मनीत राहूनसुद्धा ढोल ताशा वाजवत ‘रमणबाग ढोल ताशा पथक’ वाजत गाजत या उत्सवाच्या निमित्ताने आपली संस्कृती परंपरा जपताना पाहायला मिळाले.
परदेशात राहून सुद्धा आपल्या मराठी माणसाला गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी आमचं मंडळ गणेशोत्वाचे आयोजन करते. बाप्पा विराजमन झाल्यावर पारंपरिक पद्धतीने पूजा आरती होते. त्याशिवाय संस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने आयोजित करतो. त्यामुळे आमच्याबरोबर जर्मनीमधील स्थानिकसुद्धा या उत्सवात सहभागी होतात.