क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

आंतरपीक म्हणून त्याने चक्क गांजाच्या झाडांची लागवड


मिरज तालुक्यातील शिपूर येथे उसाच्या शेतीत आंतरपीक म्हणून गांजाची केलेली शेती उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उद्ध्वस्त केली. गांजाची जवळजवळ चारशे ते पाचशे झाडे लावली असून, या झाडांची किंमत एक कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे.

भल्या पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शेतकऱयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार दिनकर बाबर असे या शेतकऱयाचे नाव आहे.

नंदकुमार बाबर यांचे शिपूर-खंडेराजुरी रोडलगत पोटकॅनॉलजवळ एक एकर शेत आहे. यात उसाचे पीक घेतले आहे. उसाच्या पिकांमध्येच आंतरपीक म्हणून त्याने चक्क गांजाच्या झाडांची लागवड केली आहे. जवळजवळ पाचशे झाडे या ठिकाणी लावली आहेत. ही झाडे पाच फूट उंच आहेत. शिपूरमध्ये उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांना मिळाली. त्यांनी अतिशय गोपनीयता बाळगून पोलिसांचे पथक आणि उत्पादन शुल्कची टीम तयार करून पहाटे 5च्या सुमारास शेतामध्ये छापा टाकला.

नंदकुमार बाबर हे मळ्यातच राहत असल्याने अधिकाऱयांनी छापासत्र सुरू केल्यानंतर बाबर हे अपंग असल्याने त्यांनी आपल्या तीनचाकी सायकलवर बसून बाहेर आले. उसाच्या शेतात अधिकारी गांजाची झाडे उपटून बाहेर आणत होते. दिवसभर ही कारवाई सुरूच होती. अंदाजे एक कोटीच्या घरात या गांजाच्या झाडाची किंमत होऊ शकते. उसामध्ये ठरावीक अंतरावर ही गांजाची झाडे लावलेली होती. उसातून गाजाची झाडे उपटून आणण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टीमची दमछाक होत होती. मिरज तालुक्यात गांजाची एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लागवड प्रथमच झाली आहे. ही कारवाई सुरू असताना कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या पथकाने सदरची कारवाई केली. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात मिरजपूर्व भागात गांजाची शेती होत असताना स्थानिक पोलिसांना कशी काय माहिती नव्हती? गांजाच्या शेतीला पोलिसांची मूकसंमती होती का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दरम्यान, शेतकरी नंदकुमार बाबर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button