कडा येथील रेल्वेस्थानकाची काही माथेफिरुंनी तोडफोड
बीड : नगर ते आष्टी रेल्वेमार्ग पूर्ण झाला असून ठिकठिकाणी सुसज्ज रेल्वेस्थानके उभारले आहेत.
मात्र, या मार्गावर अद्याप रेल्वे धावली नाही. यामुळे येथील रेल्वे स्थानकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. कडा येथील रेल्वेस्थानकाची काही माथेफिरुंनी तोडफोड केल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु रेल्वे प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आलेली नाही. याबाबत कुठेही फिर्याद देण्यात आली नाही की दाद मागितली नसल्याने अशा घटना वाढण्याची शक्यता आहे.
नगर ते बीड, परळी रेल्वे मार्ग बहुचर्चित आहे. हा रेल्वे मार्ग आष्टी तालुक्यातुन गेला आहे. नगर ते आष्टी मार्ग पूर्ण झाला असून हायस्पीड रेल्वे चाचणी देखील झाली आहे. मात्र, रेल्वे मंत्रांच्या घोषणेनंतर ही अद्याप रेल्वे धावली नाही. दरम्यान, नगर ते आष्टी पर्यंत ठिकठिकाणी सुसज्ज रेल्वे स्थानक उभारलेली आहेत. पण अनेक महिन्यांपासून रेल्वे न धावल्याने ही स्थानके बेवारस पडली आहेत. यातूनच काही माथेफिरुंनी कडा येथील रेल्वे स्थानकांच्या खिडक्या, दरवाजे तोडल्याचे निदर्शनास आले आहे.
स्थानकात काचांचा खच आढळून आला आहे. समोरील गेटचे कुलूप तोडून टाकले आहे. मोठ्या प्रमाणावर तोडफोड होऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले असतानाही रेल्वे अधिकाऱ्यांकडून याची कसलीच फिर्याद पोलिस ठाण्यात देण्यात आली नाही.