दारुत विषप्रयोग करुन साडभावाची ठंड डोक्याने निष्ठूर हत्या
वर्धा : सासुरवाडीच्या पाच एकर शेतीच्या हिस्सेवाटणीच्या कारणातून झालेल्या वादात दारुत विषप्रयोग करुन साडभावाची ठंड डोक्याने निष्ठूर हत्या केल्याची घटना
सेलू तालुक्यातील जुनगड येथील पिंपळेमठ परिसरात घडली. या हत्या प्रकरणात पोलिसांनी सुरवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र तपासात ही हत्या असल्याचा उलगडा झाल्याने हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी मृतकाचा साडभाऊ असलेल्या मुख्य आरोपीसह विष आणणाऱ्या दोघांना सेलू पोलिसांनी अटक केलीय.
मोरेश्वर मारोतराव पिंपळे (वय 34) असे मृतकाचे नाव आहे. अटक केलेल्यात मुख्य आरोपी संदीप रामदेव पिंपळे याच्यासह विष आणून देणाऱ्या विजयसिंह चितोडीया, राजकुमार चितोडीया दोन्हींचा समावेश आहे. मृतक मोरेश्वर याने 18 ऑगस्टच्या रात्रीच्या सुमारास स्वतःच्या घरातच दारुचा घोट रिचवला. मात्र, काही मिनिटांतच तो जमिनीवर कोसळला, त्याची दातखिळ बसली.
घरातील सदस्यांनी मोरेश्वरला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी सेलू पोलिसांनी 19 ऑगस्टला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
सेलूचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जात पंचनामा केला असता संशय बळावला.
तिथे दारुची बाटली पडलेली होती. बाटलीतून उग्रवास आणि झाकणावरील बारीक छिद्रांमुळे घातपात झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ तपासचक्र फिरवून तपासाला सुरवात केलीय. दरम्यान मुख्य आरोपी असलेला साडभाऊ संदीप पिंपळे याला विचारपूस करत पोलिसी हिसका दाखवताच त्याने हत्या केल्याचे कबूल केले.
आरोपीने सासऱ्याच्या असलेल्या पाच एकर सामाईक शेतीच्या हिस्सेवाटणीवरुन झालेल्या वादाचा राग काढला. त्याने दारुत विषप्रयोग करुन मोरेश्वरला ठार मारल्याची कबूली पोलिसांना दिली. आरोपी संदीप पिंपळे याने सिनेमातील क्राईम कथानकाला लाजवेल असा खूनाचा कट रचला होता. सहा महिन्यांपासून तो हत्येच्या प्रयत्नात होता.
आरोपीने दारुची बाटली विकत घेऊन ती मृतक मोरेश्वर याच्या घरासमोर फेकून दिली आणि त्याला दारू बाहेर ठेवली असल्याच सांगितलं. त्यानंतर मोरेश्वरने जेवण केले आणि रात्रीच्या सुमारास दारुचा घोट रिचवला. मात्र, तो दारुचा घोट त्याचाच काळ ठरला. आरोपी संदीप हा शिक्षणात कमी आहे.
मात्र, त्याने ठंड डोक्याने केलेल्या निष्ठूर हत्येने पोलीसही आवाक राहिले, हे मात्र तितकेच खरे. मोरेश्वरचा मृत्यू झाल्यावरही आरोपी संदीप हा त्याच्या नातलगांना भेटण्यासाठी गेला. स्मशानात अंत्यसंस्काराला देखील गेला.
मुख्य आरोपीला अटक केल्यावर त्याने विष हे जडीबुटी विकणाऱ्याकडून आणल्याचे सांगितले.
यावरून पोलिसांनी विजयसिंह चितोडीया आणि राजकुमार चितोडीया या दोघांना अटक केली