बीड अवैध व्यवसायांना प्रोत्साहन, डीवायएसपी जायभाये यांची बदली, वासुदेव मोरे निलंबित
मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर संबधित पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित करण्यात आले असून या निर्णयामुळे नक्कीच पोलीस प्रशासनात आपले कर्तव्य न बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलीच चपराक बसल्याची चर्चा आहे.
बीड : अंबाजोगाई येथील पोलिस निरीक्षक अवैध व्यवसायांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत होते. हप्ते वसुलीचाही आरोप त्यांच्यावर झाला होता. याप्रश्नी नमिता मुंदडा यांनी अधिवेशनात लक्ष वेधले.
यावर फडणवीस यांनी डीवायएसपी जायभाये यांची तातडीने बदली तर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित करण्याची घोषणा केली.
केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी गुरुवारी (दि. १८) लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला. बीड जिल्ह्यातील धोक्यात आलेली कायदा- सुव्यवस्था आणि फोफावलेले अवैध धंदे या प्रश्नावर यापूर्वीच्या विधानसभा अधिवेशनात बरीच चर्चा झाली होती. त्यावरून तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा यांची तडकाफडकी बदली देखील झाली होती.
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांना प्रोत्साहन देणे, त्यांना पाठीशी घालणे. या प्रकरणी झालेल्या चौकशीत संबधित पोलीस निरीक्षक दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्याची तसेच संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचीही अन्यत्र बदली करण्याची घोषणा गृहमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनात केली.