चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?

तीन दशकानंतर चीनमध्ये एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. चीनमध्ये ३० वर्षांनंतर पहिल्यांदा कंडोम आणि गर्भनिरोधक औषधींवर टॅक्स लावला जाणार आहे. हा टॅक्स व्हॅटच्या स्वरुपातील असणार आहे
जगभरात सेफ सेक्स आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी जगभरात कंडोम आणि गर्भनिरोध औषधी वापरण्याला प्रोत्साहन दिले जात असताना चीनकडून कंडोम महागडे करण्याचा निर्णय का घेत आहे, असा मुद्दा यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
एपी वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, चीनच्या नवीन व्हॅट कायद्यानुसार गर्भनिरोधक औषधी आणि इतर संबंधित उत्पादने (उदा. कंडोम) १ जानेवारी २०२६ पासून टॅक्स फ्री असणार नाही. आता कंडोमवरही इतर वस्तूंप्रमाणे १३ टक्के टॅक्स आकारला जाणार आहे.
कंडोम, गर्भनिरोधक औषधींवर टॅक्स लावण्याचा निर्णय का?
चीन सरकारने असा निर्णय घेण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे देशात जन्मदराला चालना देणे. चीनने कधीकाळी असा कायदा केला होता की, एकाच मुलाला जन्म देऊ शकतील. २०१५ मध्ये सरकारने हा निर्णय बदलला आणि विवाहित दाम्पत्य दोन मुलं जन्माला घालू शकतात, असा निर्णय जारी केला.
चीनमधील लोकसंख्या वाढ सर्वोच्च पातळीवर पोहचल्यानंतर पुन्हा घटू लागल्यानंतर सरकारने आणखी एक निर्णय घेतला. सरकारने दोन मुलांना जन्म देण्याचा निर्णय बदलून तीन मुले जन्माला घालण्याची परवानगी दिली. तरीही जन्मदर वाढलेला नाही. जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या कमीच आहे.
चीनमध्ये २०२४ मध्ये किती मुले जन्माला आली?
चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोच्या माहितीनुसार, २०२४ मध्ये चीनमध्ये ९५ लाख मुले जन्माला आली होती. २०१९ मध्ये जन्माला आलेल्या मुलांच्या संख्येच्या तुलनेत ती एक तृतीयांश कमी आहे. २०१९ मध्ये चीनमध्ये १.४७ कोटी मुले जन्माला आली होती.
त्यामुळेच आता सरकारकडून गर्भनिरोधक साधनांचा वापर कमी केला जावा म्हणून टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला गेला आहे. महाग झाल्यामुळे लोक कंडोम, गर्भनिरोधी गोळ्या आणि इतर साधनांचा वापर कमी करतील आणि जन्मदर वाढेल, अशा उद्देशाने हा निर्णय घेतला गेला आहे.
जिनपिंग यांच्या निर्णयावर टीका
चीन सरकारच्या या निर्णयावर तज्ज्ञांकडून टीका होत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, किंमती वाढल्यामुळे लोक या साधनांचा वापर कमी करतील. पण, यामुळे नियोजन न करता होणारी गर्भधारणा आणि शरीरसंबंधामुळे पसरणाऱ्या रोगांमध्ये वाढ होईल.











