
अमेरिकेत दुसऱ्यांदा ट्रम्प सरकार स्थापन झाल्यानंतर मोठ्या उलथापालथी झाल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर इतर देशांवर टॅरिफचा धडाका लावला आहे. त्यामुळे इतर देशांच्या निर्यातीवर परिणाम झाला.
अमेरिकेने भारतावरही 50 टक्के टॅरिफ लादला आहे. भारत रशियाकडून तेल आयात करतो हे कारण दिलं आणि 25 टक्क्यांवरून टॅरिफ 50 नेला. पण आता अमेरिकेवर रशियाकडून अंडी आयात करण्याची वेळ आली आहे. अमेरिकेवर अशी स्थिती 1992 नंतर म्हणजेच 32 वर्षानंतर ओढावली आहे. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने आरआयए नोवोस्तीने ही माहिती दिली आहे. जुलै 2025 मध्ये अमेरिकेने रशियाकडून ताज्या कोंबडीच्या अंड्यांवर 4,55,000 डॉलर्स खर्च केले. रशियन सरकारी एजन्सीने त्यांच्या एक्स हँडलवरही ही माहिती शेअर केली. अमेरिकेत अंड्यांची कमतरता आणि वाढलेल्या किमतीमुळे हे पाऊल उचलणं भाग पडलं.
अमेरिकेत या वर्षाच्या सुरुवातीला एव्हियन फ्लूची साथ पसरली होती. त्यामुळे देशातील चिकन आणि अंड्याच्या साठ्यावर परिणाम झाला. यामुळे अंड्यांच्या किमती झपाट्याने वाढल्या. फेब्रुवारीपर्यंत अमेरिकेत एक डझन अंड्यांची किंमत 7 अमेरिकन डॉलर इतकी होती. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 16.4 टक्क्यांनी अधिक होती. त्यामुळे अमेरिकेला अंडी आयात करण्याशिवाय पर्याय नव्हत्या. अमेरिकन अन्न बाजारात स्थिरता येण्यासाठी अजून सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे अमेरिकेने 32 वर्षानंतर हा पर्याय निवडला. एकीकडे भारत आयात करतो म्हणून निर्बंध लादायचे आणि दुसरीकडे पोळी शेकायची हे काही रुचलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर वाभाडे काढले जात आहेत.
रशियाने युक्रेनवर 2022 मध्ये हल्ला चढवला होता. तेव्हापासून आतापर्यंत युद्ध्यजन्य स्थिती कायम आहे. आता या युद्धाला तीन वर्ष होत आली आहेत. मात्र अजूनही काही तोडगा निघालेला नाही.
दुसरीकडे, अमेरिका आणि रशिया यांच्यातील व्यापारात लक्षणीय घट झाली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले. अमेरिकेने रशियाकडून तेल, वायू, कोळसा, सागरी उत्पादने आणि हिरे यासारख्या गोष्टींच्या आयातीवरही बंदी घातली आहे. पण अमेरिकेवरच रशियाकडून अंडी आयात करण्याची वेळ आली.











