परळीमध्ये आतषबाजी, पुष्पवृष्टी; गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत …

श्री संत गजनान महाराज यांच्या पालखीचे प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत शुक्रवारी (ता.२०) सकाळी आगमन झाले. परळीकर भाविक भक्तांनी फटाक्यांची आतषबाजी व पुष्पवृष्टी करीत जोरदार स्वागत केले.
या दिंडीचे यंदा ५६ वे वर्ष असून दिंडीत यंदा ७०० वारकरी सहभागी आहेत.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत विविध पालख्यांचे आगमन होत आहे. या पालख्यांचे भाविक मनोभावे स्वागत करत आहेत. श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम गुरुवारी (ता.१९) औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या शक्तिकुंज वसाहतीत होता.
आज सकाळी आठच्या सुमारास श्रींची पालखी शहरातील मुख्य रस्त्यावरून मार्गस्थ झाली. या पालखीचे नागरिकांनी उत्साहात स्वागत केले व दर्शन घेतले. शहरात अनेक ठिकाणी वारकऱ्यांच्या अल्पोपाहाराची सोय केली होती. काहींनी फराळ, चहापाणी, भोजनाची व्यवस्थाही केली. दिंडी मार्गावरून जाताना वारकरी ‘हरे कृष्णा हरे रामा’, ‘गण-गण गणात बोते’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष करत होते. या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले.
संत जगमित्र नागा मंदिरात श्रींची आरती करून पुजारी औटी यांनी नैवैद्य दाखवला. गजानन महाराज यांचा पालखी सोहळा या मंदिरात मुक्कामी होता. शनिवारी (ता.२१) पहाटे पाचच्या सुमारास पालखी सोहळा अंबाजोगाईकडे प्रस्थान करणार आहे.
अस्तित्व गणेश मंडळाच्या वतीने भव्य स्वागत
शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात असलेल्या श्री संत जगमित्र नागा मंदिरात पालखी सोहळा मुक्कामी असतो. या परिसरात पालखीचे आगमन होताच अस्तित्व गणेश मंडळाच्या वतीने भव्य रांगोळी काढून, फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत करण्यात आले. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











