क्राईम

सुनेची ‘दृश्यम’ स्टाईल हत्या, बॉडी घराबाहेर गाडली; 2 महिने निवांत गेले, अन …


हुंड्याच्या हव्यासापोटी आणखी एका सुनेचा जीव गेला आहे. सुनेची दृश्यम स्टाईल हत्या करुन सासरच्या लोकांनी तिचा मृतदेह आपल्याच घरासमोरील गल्लीत १२ फूट खोल खड्डा खणून त्यात गाडला.

त्यानंतर जवळपास दोन महिने नातेवाईक आणि पोलिसांची दिशाभूल करण्यात आली. सून बेपत्ता झाल्याचं सासरच्यांकडून सांगण्यात आलं. पण कुटुंबाच्या नातेवाईकांनी या प्रकरणात हत्येचा संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रं हलवली आणि या प्रकरणातील सत्य उजेडात आलं. पोलिसांनी सासऱ्याला अटक केली आहे.

 

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील खेडा मोहल्ल्यात राहणाऱ्या २२ वर्षीय तन्नू राजपूतचा विवाह १९ मे रोजी २०२३ रोजी पल्ला येथे राहणाऱ्या अरुणशी झाला. तन्नू राजपूत दहावीपर्यंत शिकलेली होती. अरुण त्याच्या वडिलांचं कपड्याचं दुकान चालवायचा. लग्नानंतर काही दिवसांनी पती-पत्नीमध्ये वाद सुरु झाला. भांडणं झाल्यावर तन्नू वारंवार माहेरी जायची. तन्नू तिच्या मर्जीनं घर सोडून गेल्याचं तिच्या सासरच्यांनी २३ एप्रिल तन्नूच्या माहेरी कळवलं. यानंतर तन्नू बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पण पोलिसांना तिचा सुगावा लागला नाही.

 

तन्नूची हत्या झाल्याचा संशय तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केला. त्यांचा संशय सासरच्यांवर होता. यानंतर पोलिसांनी सासरच्यांची चौकशी सुरु केली. तेव्हा त्यांनाही संशय आला. अखेर चौकशी आणि तपासानंतर तन्नूचा सासरा भूप सिंहला अटक करण्यात आली. त्यानं दोन महिन्यांपूर्वी शौचालय बांधण्यासाठी घरासमोर खड्डा खणला होता. ही माहिती समोर येताच पोलिसांचा संशय आणखी वाढला. पोलिसांनी शुक्रवारी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निगराणीत अर्थमूव्हर मशीनच्या मदतीनं भूप सिंहच्या घरासमोर खड्डा खणला. तेव्हा तिथे महिलेचा मृतदेह सापडला.

 

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांकडून गु्न्हे शाखेची मदत घेण्यात येत आहे. भूप सिंहच्या घराचं काम करणाऱ्या गवंड्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली. शौचालयासाठी भूप सिंह यांनी खड्डा खणायला सांगितला होता, अशी माहिती गवंड्यानं दिली. ‘त्यांनी माझ्याकडून खड्डा खणून घेतला होता. खड्डा खणून मी घरी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आलो, तेव्हा खड्डा भरलेला होता. आम्हाला शौचालय तयार करायचं नाही, केवळ जिना तयार करायचा आहे, असं भूप सिंह यांच्या कुटुंबानं सांगितलं. त्यानंतर मी त्यांना जिना करुन दिला. खड्ड्याच्या वरही विटा टाकण्यात आलेल्या होत्या,’ अशी माहिती गवंड्यानं दिली. त्यानंतर पोलिसांनी तिथे खोदकाम करण्याचा निर्णय घेतला.

 

तन्नूची मोठी बहीण प्रीतिनं भूप सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘भूप सिंह यांनी माझ्या बहिणीचा एक व्हिडीओ जबरदस्तीनं तयार केला. त्यात तन्नू घर सोडून जाईन असं म्हणताना दिसत आहे. पोलीस जेव्हाही घरी यायचे तेव्हा सासरचे लोक त्यांना तन्नूचा तो व्हिडीओ दाखवायचे आणि तन्नू स्वत:हून घर सोडून गेल्याचं सांगायचे,’अशी माहिती प्रीतिनं दिली. या हत्या प्रकरणात भूप सिंहसोबत त्याची पत्नी सोनिया, पती अरुण, नणंद आणि आत्येचा सहभाग असल्याचा आरोप तिनं केला.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button