आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्याने शिवसेनेत उत्साह पण वाटचाल काटेरी
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापुरातून बडय़ा नेत्यांचा प्रतिसाद मिळाल्याने गलितगात्र झालेल्या शिवसेनेत उत्साहाची बीजे पेरण्याचे काम युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्याने साध्य झाले.
तरुणाईचा उत्साहवर्धक प्रतिसाद होता. बंडखोरांना चिंता वाटायला लागेल अशी वातावरणनिर्मिती झाली असली तरी हेच वारे निवडणुकीपर्यंत टिकवण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असेल.
एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा घेतल्यावर शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेतील खासदार, आमदार मोठय़ा संख्येने शिंदे यांच्यासोबत राहिले. याचा मोठा परिणाम म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार, माजी राज्यमंत्री, आमदार, माजी आमदार हे शिंदे यांच्या छावणीत दाखल झाल्याने बालेकिल्ला बनत चाललेल्या या जिल्ह्याला मोठे भगदाड पडले.
प्रतिसाद उत्साहवर्धक
शिवसेनेला अनुकूल असलेल्या आजरा तालुक्यात ठाकरे यांनी जिल्ह्यातील पहिली सभा घेतल्याने स्वाभाविकच तरुणाई त्यांच्याभोवती उत्स्फूर्तपणे जमली. ५५० कोटी रुपयांचा मोठा निधी देणे ही ठाकरे यांची चूक झाली का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांनी असे का केले, अशी विचारणा केली. जिल्ह्यात खासदार, आमदार फुटलेले असताना केवळ दोन दिवसांच्या दौऱ्यात ठाकरे यांनी केवळ आबिटकर यांचाच नामोल्लेख केला. इतर ठिकाणी सूचक विधान करीत फुटिरांवर शरसंधान केले. कोल्हापूर व जयसिंगपूर येथील भर पावसात झालेल्या सभेला लक्षणीय साथ मिळाली. हा प्रतिसाद बंडखोरांना चिंता वाटायला लावेल अशा स्वरूपाचा होता. यातून या दौऱ्यातून जिल्ह्यातील निस्तेज शिवसेनेत प्रेरणा देण्याचे काम ठाकरे यांनी केले.