रात्री भावाचे १५ मिसकाॅल आले होते; तरुणी नराधमांच्या जाळ्यात अडकली, सामूहिक अत्याचार

भावाला मारहाण करून बहिणीला रात्री फोनद्वारे खोटे कारण सांगून रात्रीच बोलावून घेत तिच्यावर दोन वेगवेगळ्या निर्जन ठिकाणी अत्याचार केल्याची घटना गुरुवारी भिवंडीत घडली.
याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शांतीनगर परिसरातील फातमानगर परिसरात राहणारी २२ वर्षीय तरुणी शेलार येथे आतेबहिणीकडे गेली होती. रात्री तिला भावाचे १५ मिसकाॅल आले होते. १२ वाजता तिला अचानक जाग आली. तिने मोबाइलमधील मिसकाॅल बघून भावाकडे चौकशी करण्यासाठी फोन केला. त्यावेळी भावाने, ‘माझी तब्येत बरी नाही, तू बागे फिरदौस येथे ये’ असे सांगितले. त्यामुळे पीडित तरुणी ओळखीच्या रिक्षाचालकासोबत बागे फिरदौस येथे आली. तेथे दबा धरून बसलेले सदरे ऊर्फ मोहम्मद साईद आलम, पाशा, लड्डू, गोलू व इतर दोन जण (सर्व रा. फातमानगर) यांनी पीडितेसह तिचा भाऊ व रिक्षाचालकास मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने रिक्षात बसवून नागाव येथील जुनी नवजीवन इंग्रजी शाळेच्या पाठीमागे असलेल्या झाडाझुडपांत पीडितेला नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
पीडिता, तिचा भाऊ आणि रिक्षाचालकाला धमकी
एकदा बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिला पुन्हा फातमानगर येथे घेऊन गेले. तेथे उभ्या असलेल्या एका पिकअप बोलेरो गाडीत पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित तरुणी, तिचा भाऊ आणि रिक्षाचालकाला धमकावून पसार झाले.
या घटनेनंतर भयभीत पीडित तरुणीने भिवंडी तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून पहिला गुन्हा शांतीनगर पोलिस ठाण्यात घडला असल्याने तो शांतीनगर पोलिस ठाण्यात वर्ग केला आहे. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.