‘या’ देशात नाही एकही नदी, तरीही मिळते भरपूर पाणी!

रियाध : पाण्याशिवाय आपण जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. मात्र, जगात असे काही देश आहेत, जिथे पाण्याचे मोठेच दुर्भिक्ष आहे. सौदी अरेबिया हा देश यामध्ये समाविष्ट होतो. या देशात एकही नदी किंवा सरोवर नाही.
या वाळवंटी भागात तेल मोठ्या प्रमाणात मिळते; पण पाणी मिळत नाही. मात्र, तरीही तिथे पाणी उपलब्ध होते. ते कसे होते, हे पाहूया…
सौदी अरेबियात केवळ एक टक्का जमिनीवर शेती केली जाते. त्यामध्ये काही भाज्यांचेच उत्पादन घेतले जाते. गव्हासारख्या काही धान्यांची शेती करण्यासाठी भरपूर पाण्याची गरज असते. एकदा तिकडे गव्हाची शेती सुरूही झाली होती; पण पाण्याच्या कमतरतेने ती बंद करण्यात आली. सौदीला आपल्या खाण्यापिण्याच्या गरजेच्या अनेक वस्तू परदेशातूनच आयात कराव्या लागतात. सौदीमध्ये सध्या थोडेफार भूमिगत जल शिल्लक आहे. मात्र, ते अतिशय खोलवर आहे. येत्या काही वर्षांमध्येच ते संपुष्टात येईल, असे म्हटले जाते. एका रिपोर्टनुसार, सौदीमध्ये पाण्याच्या अनेक विहिरी होत्या, ज्यांचा वापर हजारो वर्षे करण्यात आला.
मात्र, लोकसंख्यावाढीसोबतच हे भूमिगत पाणीही कमी होत गेले. हळूहळू विहिरींची खोली वाढत गेली आणि बहुतांश विहिरी कोरड्या पडल्या. याठिकाणी वर्षातून एक-दोन दिवसच पाऊस पडतो. त्यामुळे तितके पाणी साठवून ठेवणे शक्य नाही. या पावसामुळे भूमिगत पाण्याचा साठाही वाढत नाही. ही समस्या असली तरी सौदीला समुद्रकिनारा लाभला आहे.
अर्थात, समुद्राचे खारे पाणी आपण पिऊ शकत नाही. त्यामध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी डिसालिनेशनद्वारे या पाण्यातून मीठ वेगळे केले जाते आणि ते पिण्यास योग्य बनवले जाते. सौदीशिवाय कोमोरोस, लिबिया, मोनॅको, व्हॅटिकन सिटी आणि ओमानसारख्या देशांमध्येही नद्यांचे अस्तित्व नाही. यापैकी बहुतांश देशांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी समुद्राचे पाणीच डेसीलेट केले जाते.