लाडक्या बहिणींनो फेब्रुवारीचा हप्ता मिळण्यास सुरुवात, तुमच्या खात्यात आले का? असं तपासा स्टेटस

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले होते. पण आता प्रतिक्षा संपलेली आहे.
कारण, आजपासून (21 फेब्रुवारी) लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
लाडक्या बहिणींच्या खात्यात आठवा हप्ता
राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आतापर्यंत एकूण सात हप्त्यांचे एकूण 10,500 रुपये (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी) लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता आठवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या बँक खात्यात जमा होत आहे.
हे पण वाचा : ‘…. तर लाडक्या बहिणींना मिळणारा लाभ बंद होईल’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
तुमच्या बँक खात्यात आले का पैसै? असं तपासा स्टेटस
लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यास तुम्हाला तुमच्या बँकेकडून एसएमएस (SMS) येईल.
बँकेकडून एसएमएस न आल्यास तुम्ही बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांकावर एसएमएस पाठवून किंवा टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल करुन तुमच्या बँक खात्यातील रकमेच्या संदर्भात जाणून घेऊ शकता.
तुमच्याकडे स्मार्टफोन असेल आणि नेट बँकिंग, गुगल पे, फोन पे वापरत असाल तर बँक बॅलन्स तपासू शकता.
डेबिट कार्ड असल्यास एटीएममध्ये जाऊन लास्ट ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहू शकता.
तसेच बँकेत जाऊन तुम्ही आपल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासू शकता.
हे पण वाचा : ….तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही, तुम्ही जमा केले का कागदपत्रे?
या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही
28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात आले आहे. यापैकी काही बहिणींनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आणि हे जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी स्वत:हून योजनेचा लाभ घेणे बंद केले. तसेच अनेक महिलांनी स्वत:हून पैसे परत केले आहेत.
अपात्र महिलांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – 2,30,000 महिला, वय वर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला -1,10,000 महिला, कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – 1,60,000 महिला अशा एकूण 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. अपात्र महिलांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तसेच, लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै 2024 ते डिसेंबर 2024) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असेही सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.