VIDEO : ट्रक चालकाच्या एका चुकीमुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू
राजस्थानातूनअपघाताची एक भीषण घटना समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या अपघाताचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा बळी गेला होता.
या अपघातात सुरुवातीला एका अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याची माहिती पुढे आली होती. मात्र सीसीटीव्ही फुटेजनुसार, ट्रकचालकाच्या एका चुकीमुळे हा भीषण अपघात घडल्याचे समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सवाई माधोपुर हादसे का लाइव वीडियो, ट्रक चालक की एक लापरवाही से ऐसे खत्म हो गया था सीकर का एक परिवार, 6 लोगों की हुई थी मौत। @FMSIKAR #Sikar #Sawaimadhopur #Rajasthan #Accident #Live #Video pic.twitter.com/x31Z8KDUis
— Naveen Parmuwal (@naveenparmuwal) May 8, 2024
रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास राजस्थानमधलं एक कुटुंब सवाई माधोपूर एक्स्प्रेस वेवरुन सिकरहून त्रिनेत्र गणेश मंदिराकडे जात होते. त्यावेळी एका ट्रकने कुटुंबाच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेस कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश होता. या अपघातात दोन लहान मुले देखील जखमी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं. मात्र तीन दिवसांनी या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
सीसीटीव्ही फुटेजनुसार, महामार्गावर धावणाऱ्या ट्रकने अचानक यू-टर्न घेतल्याने मागून येणारी कार ट्रकला धडकली. अपघात झाल्याचे पाहून रस्त्याच्या कडेला ट्रकजवळ उभ्या असलेल्या काही लोकांनी रेलिंगवरून उड्या मारून पळ काढला. अपघातानंतर ट्रकचालकानेही संधी साधून तेथून पळून काढला. अपघातानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे बोली पोलिसांनी काही तासांतच ट्रक ताब्यात घेतला पण त्यामध्ये चालक नव्हता. पोलिसांचे पथक ट्रक चालकाचा शोध घेत आहे.
मुकुंदगडचे रहिवासी असलेले हे कुटुंब रणथंबोर त्रिनेत्र गणेश मंदिराच्या दर्शनासाठी सीकरहून सवाई माधोपूरला जात होते. या अपघातात सीकरचे रहिवासी मनीष शर्मा, त्यांची पत्नी अनिता शर्मा, सतीश शर्मा, पूनम, संतोष आणि कैलाश यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात मनन आणि दीपाली ही दोन मुले जखमी झाली आहेत.