गर्भधारणा करायला लावून आई-वडिलांनीच विकली पोटच्या मुलीची मुलं
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका 17 वर्षीय तरुणीने दुसऱ्या धर्मातील 23 वर्षीय तरुणाशी मैत्री करून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा तिच्या आई-वडिलांना ती गरोदर असल्याचं कळलं, तेव्हापासून तिच्या आयुष्यात अडचणी येऊ लागल्या.
तिला पुन्हा गरोदर राहण्यास भाग पाडून तिच्या नवजात मुलांना विकण्यात आलं.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुलीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली की दोन वेगवेगळ्या पुरुषांशी आलेल्या संबंधांमुळे ती दोनदा गरोदर राहिली आणि तिच्या पालकांनी शाळेचे मुख्याध्यापक, दोन महिला डॉक्टर, एक सामाजिक कार्यकर्ता, एक वकील आणि इतर अनेकांबरोबर मिळून तिच्या नवजात बाळाला विकण्याचा कट रचला. मुलीच्या पालकांसह जवळपास 16 जणांवर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि बाल न्याय कायदा अंतर्गत बलात्कार आणि बाळ विकण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या हवाल्याने पोलिसांनी सांगितलं की, 2021 मध्ये 23 वर्षीय पुरुषासोबत मुलीच्या शारीरिक संबंधांनंतर तिच्या पालकांना तिच्या गर्भधारणेची माहिती कळाली. त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेतली. त्यावेळी इयत्ता सातवीचं शिक्षणं सोडलेल्या या मुलीला नियमित तपासणी आणि प्रसुतीसाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिच्या गरोदरपणात तिचे आई-वडील तिला मुंबईतील एका ठिकाणी घेऊन गेले, जिथे वकिलाने तिला काही कागदपत्रांवर सही करायला सांगितलं होतं.
24 सप्टेंबर 2021 रोजी तिने एका मुलीला जन्म दिला, ते बाळ जन्माच्या दुसऱ्याच दिवशी सामाजिक कार्यकर्त्याकडे सोपवण्यात आलं. यावेळी पीडितेला प्रसुतीबाबत कुणालाही सांगू नकोस, असं सांगण्यात आलं. असं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे.
रिपोर्टमध्ये पुढे म्हटलं आहे की प्रसुतीनंतर सहा महिन्यांनी, तिने मुलाच्या वडिलांशी (म्हणजेच तिच्या प्रियकराशी) संपर्क साधला. त्यावेळी तिच्या प्रियकराने दावा केला की त्याने सामाजिक कार्यकर्त्याला चार लाख रुपये दिले आहेत. त्याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु मध्यस्थांनी त्याला दूर राहण्याचा इशारा दिला होता.
तिचे आई-वडील आणि काकांनी प्रत्येकी दीड-दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप मुलीने केला आहे, तसेच उर्वरित एक लाख रुपये सामाजिक कार्यकर्ते आणि इतर काहींनी वाटून घेतले आहेत. जेव्हा तिने तिच्या आई-वडिलांना याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी तिला तिच्या आजीच्या घरी पाठवून दिलं. तिथं त्यांनी तिचं लग्न एका 23 वर्षीय तरुणाशी ठरवलं.