डोनाल्ड ट्रम्प आणि पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्स यांच्यातील खटला सुरू, काय आहे संपूर्ण प्रकरण ?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला सुरू आहे. त्यांच्यावर लाच देण्यापासून ते पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्स प्रकरण पर्यंतचे वेगवेगळे आरोप आहेत.
या खटल्यात पेमेंट करण्यासाठी व्यवसायात खोट्या नोंदी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
स्टॉर्मी डॅनियल्सने आरोप केला आहे की ती आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी सेक्स केला होता.
या प्रकरणाबद्दल गप्प राहण्यासाठी स्टॉर्मी डॅनियल्सला ट्रम्प कडून 1,30,000 डॉलर्स मिळाले होते. ही रक्कम ट्रम्प यांच्या माजी वकिलानं 2016च्या निवडणुकीपूर्वी दिली होती.
या वकिलाचं नाव मायकल कोहेन असं असून त्याला नंतर विविध आरोपांखाली तुरुंगवास झाला होता.
हे आरोप 2018 मध्ये उजेडात आले. त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टॉर्मी डॅनियल्सबरोबर कोणत्याही प्रकारचा लैंगिक संबंध ठेवण्याचा इन्कार केला होता.
स्टॉर्मी डॅनियल्स कोण आहे?
स्टॉर्मी डॅनियल्स ही 45 वर्षांची असून तिचं खरं नाव स्टेफनी क्लिफोर्ड आहे.
अमेरिकेतील लुईसिआना इथं जन्मलेली स्टॉर्मी डॅनिएल्स एक पॉर्न स्टार आणि दिग्दर्शक आहे. तिच्या चित्रपटांसाठी तिला अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत.
पॉर्न फिल्म्सबरोबरच तिनं हॉलीवूडच्या मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्येदेखील भूमिका केल्या आहेत. यात ‘द 40 ईयर ओल्ड व्हर्जिन’ आणि ‘नॉक्ट अप’ यासारखे 2000च्या दशकातील विनोदी चित्रपटदेखील आहेत.
ती राजकारणात देखील उतरली होती आणि सुरूवातीला ती रिपब्लिकन पक्षाकडून होती. डोनाल्ड ट्रम्प याच रिपब्लिकन पक्षाचे आहेत.
स्टॉर्मी डॅनियल्सचा आरोप
स्टॉर्मी डॅनियल्सने प्रसार माध्यमांमध्ये दिलेल्या मुलाखतींमध्ये असं म्हटलं होतं की डोनाल्ड ट्रम्पची आणि तिची भेट जुलै 2006 मध्ये समाजसेवेसाठी निधी गोळा करणाऱ्या एका गोल्फ स्पर्धेत झाली होती.
डोनाल्ड ट्रम्प आणि तिने कॅलिफोर्निया आणि नेवाडा दरम्यान असणाऱ्या लेक ताहो या रिसोर्ट मधील हॉटेलच्या रुममध्ये एकदा सेक्स केल्याचा आरोप तिनं केला होता. त्यावेळेस ट्रम्प यांच्या वकिलानं डॅनिएल्सचा आरोप जोरदारपणं धुडकावून लावला होता.
ट्रम्प यांनी तिला त्या रात्रीच्या प्रसंगाबद्दल गप्प राहण्यास सांगितलं आहे का? या मुलाखतकाराने विचारलेल्या एका प्रश्नाला ”त्यांना याबद्दल कोणताही चिंता दिसत नाही. ते खूपच उद्धट आहेत,” असं उत्तर डॅनियल्सनं दिलं होतं.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिआ ट्रम्प त्या गोल्फ स्पर्धेच्या ठिकाणी हजर नव्हत्या. त्यांनी नुकतंच बाळाला जन्म दिला होता
गप्प राहण्यासाठी पैसा आणि धमक्या
स्टॉर्मी डॅनियल्स सांगते, कोहेन या वकिलानं 2016च्या निवडणुकीच्या काही दिवस आधीच तिला 1,30,000 डॉलर्सची रक्कम दिली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच्या संबंधांबद्दल गप्प राहण्यासाठी तिला हे पैसे देण्यात आले होते. त्या निवडणुकीत ट्रम्प यांचा विजय झाला होता.
डॅनियल्स म्हणते तिने ते पैसे घेतले होते कारण तिला तिच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची चिंता वाटत होती. ती पुढं सांगते की गप्प राहण्यासाठी तिला मारण्याच्या आणि कायदेशीर कारवाई करण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या.
Getty Images
2018 मध्ये लास वेगासच्या पार्किंग परिसरात एक अनोळखी व्यक्ती डॅनियल्स आणि तिच्या लहान बाळाला भेटली होती. त्या व्यक्तीनं डॅनिएल्सला धमकावताना ट्रम्पपासून दूर राहण्यास सांगितलं होतं.
तिनं ‘इन टच’ या मासिकाला या कथित प्रकरणाबद्दल मुलाखत देण्यास होकार दिल्यानंतर लगेचच हा प्रसंग घडला असल्याचं डॅनिएल्स सांगते.
बाळासमोर घडलेल्या या प्रसंगाबद्दल बोलताना डॅनिएल्स सांगते की ती अनोळखी व्यक्ती म्हणाली होती की ”ही एक सुंदर लहान मुलगी आहे. तिच्या आईला जर काही झालं असतं तर ती अत्यंत लाजिरवाणी गोष्ट ठरेल.”
‘सीबीएस 60 मिनिट्स’ला दिलेल्या मुलाखतीत डॅनियल्सने या घटनेचं वर्णन केलं होतं.
ही मुलाखत प्रसारित होण्याआधी कोहेनशी संबंधित एका बनावट कंपनीनं डॅनियल्सला धमकावलं होतं. या कंपनीनं डॅनियल्सला 2 कोटी डॉलर्सचा खटला भरण्याची धमकी दिली होती. गप्प राहण्यासाठी डॅनिएल्सनं त्यांच्याबरोबर केलेली डील मोडल्याचं त्या कंपनीचं म्हणणं होतं.
स्टॉर्मी डॅनियल्सनं सीबीएस मधील कार्यक्रमात सांगितलं होतं की राष्ट्रीय स्तरावरील वाहिनीशी बोलून ती लाखो डॉलर्सच्या दंडाचा धोका पत्करते आहे. ”मात्र स्वत:चा बचाव करता येणं हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं.”
’60 मिनिट्स’च्या मुलाखतीच्या तीन महिने आधीपर्यत इन टच ला डॅनिएल्सनं दिलेली मुलाखत 2018 पर्यत पूर्ण प्रकाशित झाली नव्हती.
गप्प राहण्यासाठी पैसे देणं बेकायदेशीर आहे का?
बेकायदेशीर कृत्याबद्दल किंवा गोपनीय बाबीबद्दल गप्प राहण्यासाठी पैसे देणं हे काही बेकायदेशीर नाही. मात्र फिर्यादी पक्षानं या प्रकरणात, कोहेन यांनी या पैशांची नोंद ट्रम्पच्या खात्यात ज्या पद्धतीनं केली होती त्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. ट्रम्प यांनी व्यवसायात खोट्या नोंदी करत ही रक्कम कायदेशीर बाबींसाठी केलेला खर्च म्हणून दाखवली होती.
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकांच्या काही दिवस आधीच ही रक्कम देण्यात आली होती. जिल्हा दंडाधिकारी ऑल्विन ब्रॅग यांचा आरोप होता की मतदानावर प्रभाव टाकणारी माहिती लपविण्यासाठी केलेले गुन्हे लपवण्यासाठीचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला होता.
Getty Images
ऑगस्ट 2018 मध्ये कोहेन यांना तुरुंगवास झाला होता. कर चुकवेगिरी आणि प्रचार करताना असणारे आर्थिक नियम मोडणे हे आरोप सिद्ध झाल्यामुळं कोहेनना शिक्षा झाली होती. यातील काही भाग स्टॉर्मी डॅनियल्सला तिच्या ट्रम्पबरोबरच्या संबंधांबद्दल गप्प राहण्यासाठी पैसे देण्याशी संबंधित होता.
सुरूवातीला जरी कोहेन यांनी ट्रम्प यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा इन्कार केला होता तरी नंतर मात्र कोहेन यांनी शपथेवर सांगितलं होतं की ट्रम्प यांनीच डॅनियल्सला ती 1,30,000 डॉलर्सची रक्कम देण्यास सांगितलं होतं.
कोहेन यांनी असं सांगितलं होतं की राष्ट्राध्यक्षांनी याची परतफेड केली होती.
ट्रम्प यांनी काय सांगितलं?
मॅनहॅटन येथील फौजदारी न्यायालयात व्यवसायात खोट्या नोंदी केल्यासंदर्भातील 34 गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी नसल्याचं ट्रम्प यांनी न्यायालयात म्हटलं आहे.
स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देण्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आला होता. डॅनियल्ससारखंच ट्रम्प यांचं आणखी एक प्रकरण आहे. प्लेबॉय मासिकाच्या एका माजी मॉडेलशी ट्रम्प यांचे कथित लैगिंक संबंध होते. त्याबद्दल गप्प राहण्यासाठी त्या मॉडेलला पैसे दिल्याच्या प्रकरणाचादेखील तपास सुरू आहे.
या खटल्याच्या सुनावणीअगोदर ट्रम्प यांनी या खटल्याचे कामकाज पाहणाऱ्या न्यायाधीशावर निशाणा साधला आहे. आपल्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिताना ट्रम्प यांनी त्या न्यायाधीशाला डेमोक्रॅटचा हस्तक असल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणाचं महत्त्व?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी, त्यांचं पूर्वीचं वर्तन आणि महिलांसंदर्भात त्यांच्यावर झालेले आरोप याकडे बहुतांश डोळेझाक केली आहे. यात कडवे धार्मिक लोकदेखील आहेत.
मात्र यावर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे आणि याच वर्षी मॅनहॅटन प्रकरणाची सुनावणी होते आहे. या सुनावणीमुळं रिपब्लिकन पक्षाचे मुख्य प्रचारक असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचार मोहिमेतून वारंवार बाजूला व्हावे लागणार आहे. कारण या खटल्याची सुनावणी सहा आठवड्यांपर्यंत चालण्याची शक्यता आहे.
Getty Images
दिवसा न्यायालयात सुनावणीला हजर राहण्यास आणि रात्रीच्या वेळी निवडणुकीचा प्रचार करण्यासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली होती. गुन्हेगारी खटल्यातील आरोपी म्हणून ट्रम्प यांना न्यायालयात हजर राहणं कायद्यानं बंधनकारक आहे.
न्यायाधीश जुआन मरकॅन यांनी ट्रम्प न्यायालयात गैरहजर राहिल्यास वॉरंट काढण्याची चेतावनी आधीच दिली आहे. यामुळं ट्रम्प यांची निवडणूक प्रचार मोहिम गुंतागुतींची होण्याची शक्यता आहे.
”मात्र अगदी गुन्हेगारी खटल्यात आरोप सिद्ध झाल्यावर देखील ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत प्रचार करण्यापासून रोखता येणार नाही,” असं बीबीसीचे उत्तर अमेरिका खंडातील प्रतिनिधी अॅंथनी झुर्कर सांगतात.
ते पुढं म्हणतात, ”एखाद्या आरोपीवर गुन्हा सिद्ध झालेला असल्यास त्याला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचार करण्यापासून रोखणारी आणि तुरुंगातून कारभार करण्यास प्रतिबंध करणारी कायदेशीर तरतूदच अमेरिकेच्या कायदाव्यवस्थेत नाही.”