सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे दोघे अखेर अटकेत
सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. गोळीबार करणाऱ्या दोन्ही हल्लेखोरांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गुजरातच्या भूज भागातून त्यांना अटक करण्यात आली.
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच विभागाने ही अटक केली. तांत्रिक तपास करत ही अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे.
हल्लेखोरांचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. काही हजार रुपयांसाठी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याची कबुली या दोघांनी चौकशीत दिली. गोळीबार करण्याआधी दोघांनी सलमान खानच्या घराची रेकी केली होती. पकडले जाऊ नये यासाठी त्यांनी मध्यरात्री देखील सलमान खानच्या घराची रेकी केली होती.ट
सलमान खानच्या घराबाहेर रात्री उशीरापर्यंत चाहत्यांची गर्दी असल्याने पहाटे गोळीबार करण्याचा प्लॅन त्यांनी आखला होता. या प्लॅननुसारच त्यांनी हा गोळीबार केला. गोळीबारानंतर दोघेही गुजरातला पळून गेले होते. मात्र, अखेर मुंबई पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन्ही हल्लेखोरांना गुजरातच्या भूज भागातून अटक केली आहे.ट
नक्की काय घडलेलं?
रविवारी पहाटे बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्र्याच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली. पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास सलमान खानच्या वांद्र्यातल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर बाईकवरून आलेल्या दोघांनी पाच ते सहा राऊंड फायर केले. यातली एक गोळी सलमान खानच्या गॅलरीवरही झाडण्यात आली. बाईकवर आलेल्या या दोघांनी हेल्मेट घातल्यामुळे त्यांचा चेहरा झाकलेला होता. पोलिसांनी 50 हून अधिक सीसीटीव्हींची पडताळणी केली आहे.