लोकसभेआधी उद्धव ठाकरेंनी टाकला मोठा डाव, प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात
मुंबई : एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाला उद्धव गटाने आव्हान दिलं आहे. आता या प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे दोन्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलेलं आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या निर्णयात मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला होता. यासोबतच शिंदे गट हीच खरी शिवसेना असं म्हटलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. विधानसभेतील बहुमताच्या जोरावर शिंदे गटालाच खरी शिवसेना मानण्याचा सभापतींचा निर्णय चुकीचा असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून उठाव केल्यानं पक्षात फूट पडली होती. त्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आम्हाला पक्षातील सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा असून आमचीच शिवसेना खरी आहे, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला. तसंच पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण आणि नावावर देखील शिंदे गटानं दावा केला. त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला. शेवटी निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे दोन्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलेलं आहे. याच निर्णयावर आता उद्धव ठाकरे गटाने आक्षेप घेत आव्हान दिलं आहे.