ताज्या बातम्या

जरांगे पाटलांचा थेट मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना इशारा,मराठ्यांशी पंगा घेऊ नका ..


मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उद्या (25 फेब्रुवारी) मराठा समाजाची महत्त्वाची आणि मोठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत ‘सगळं’ बाहेर काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

त्यामुळे जरांगे पाटील नक्की कुणाला लक्ष्य करणार, कुणाचा ‘गेम फेल’ करणार? याकडे मराठा समाजाचे लक्ष लागलं आहे.

आज अंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarati) पत्रकारांशी बोलताना त्यांनी रास्ता रोको मागे घेऊन त्याऐवजी धरणे आंदोलन करणार असल्याचं स्पष्ट केलं. परीक्षा सुरू असल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात करण्याचा निर्णय घेतल्याचं जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) स्पष्ट केलं.

मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) देताना ‘सगेसोयरे’ यांनाही आरक्षण द्यावे, तसेच या मागणीचा अध्यादेश काढावा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 10 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा उपोषणाला बसले आहेत. या वेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. आम्ही न मागता 10 टक्के आरक्षण कशाला दिलं? सरकार रडीचा डाव खेळत असून, ही दादागिरी आहे, असा आरोप जरांगेंनी केला.

दरम्यान, या वेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना इशारा दिला. या दोघांच्या जवळचा एक मिशीवाला माणूस नाटकं करतोय. तो तुमच्या जिवावर नाटकं करतोय, असं आम्हाला येऊन सांगतोय. तेव्हा तुम्ही त्याला आवरा नाहीतर तुम्ही दोघेही अडचणीत याल, असा थेट इशारा जरांगेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि आरोग्यमंत्री सावंतांना दिला.

मराठ्यांशी पंगा घेऊ नका, तुमचे डाव थांबवा, असं आवाहन जरांगेंनी सरकारला केलं. आता आंदोलन थांबणार नाही. रास्ता रोको मागे घेतलं म्हणजे माघार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. केवळ विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आज दुपारनंतर रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात केलं जाणार आहे. त्यानंतर 3 मार्चला राज्यात मोठं रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जरांगेंनी दिला.

…तर गाठ माझ्याशी

रास्ता रोको केल्यावर पोलिस गुन्हे दाखल करत आहेत. असं झाल्यास मला सांगा. शांततापूर्ण रास्ता रोको आंदोलन केल्यावर गुन्हे दाखल केल्यास माझ्याशी गाठ आहे, असा इशारा जरांगेंनी पोलिसांना दिला आहे. त्याचवेळी रास्ता रोको करताना व्हिडिओ शूटिंग करण्याचं आवाहन त्यांनी आंदोलकांना दिलं. त्यामुळे घुसखोर कळतील, असे जरांगे म्हणाले.

तीन राजे

एक राजा निर्णय घेत असताना दोन राजांनी साथ द्यावी, पण राज्यात भलतंच चाललंय. असं राज्य चालवतात का? असा सवाल जरांगे पाटील यांनी केला. आम्हाला जबरदस्तीने 10 टक्के आरक्षण कशाला देता? आमची मागणी ओबीसीतून आरक्षण देण्याची आहे आणि ‘सगेसोयरे’ शब्दाचा अध्यादेश काढण्याचा आहे, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button