मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याच्या गाडीवर हल्ला, अज्ञातांकडून वाहनाची तोडफोड
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्याच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. चारचाकी वाहनाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे.
जरांगे- पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे हे मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय आहेत. त्यांच्या गाडीवर हा हल्ला झाला आहे. विशेष म्हणजे गाडीची तोडफोड केल्यावर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.
मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनातील सहकारी असलेले बीड येथील गंगाधर काळकुटे यांच्या गाडीवर रात्री अज्ञातांनी हल्ला करून गाडीची तोडफोड केली आहे. गंगाधर काळकुटे हे रात्री मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले होते.
मनोज जरांगे यांची भेट घेऊन परत येत असताना वडीगोद्री गावाजवळ एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी ते थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्या फॉर्च्युनर गाडीच्या काचा फोडल्या. गाडीवर हल्ला केल्यावर दोनही अज्ञातांनी तेथून पळ काढला. त्यामुळे घटनास्थळी काही काळ वातावरण तापले होते. मात्र, हा हल्ला कोणी आणि का केला याबाबत अजूनही कोणतेही माहिती समोर येऊ शकलेली नाही.
याबाबत गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मराठा आंदोलन चिरडण्याचा डाव…
मराठा आरक्षणाबाबत सुरु असलेले आंदोलन चिरडण्याचा हा डाव आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसेच, आंदोलन चिरडण्यासाठी कोणी कितीही प्रयत्न केले. तरी
शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहोत. आणि मराठा आरक्षणाची लढाई कायम सुरू ठेवणार असल्याचे गंगाधर काळकुटे म्हणाले.