मोठी बातमी! विशेष अधिवेशनात मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाचा कायदा होणार..
मराठा आरक्षणाच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी विधीमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावल्याची माहिती मिळाली आहे. येत्या 20 आणि 21 फेब्रुवारीला विधीमंडळाचं विशेष अधिवेशन असणार आहे.
अधिवेशनात मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाचा कायदा होणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी फडणवीस सरकारकडून एसीबीसीचं आरक्षण मराठ्यांना देण्यात आलं होतं. त्याच्या तरतुदी या अधिवेशनात केल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन कधी बोलवणार? असा सवाल केला होता. त्यानंतर आता राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे.
सूत्रांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. दोन दिवसांच्या अधिवेशानत महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे. येत्या 20 फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल अभिभाषण आणि शोक प्रस्ताव सादर होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 21 फेब्रुवारीला मराठा आरक्षण अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर होणार !
दुसरीकडे मंत्री उदय सामंत यांनी याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “मनात आलं म्हणजे विधीमंडळाचं अधिवेशन घेता येत नाही”, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. “मंत्रिमंडळामध्ये झालेल्या निर्णयानुसार 20 तारखेला अधिवेशन होणार आहे”, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. “जरांगेंवर नाराजी नाही. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी”, असंही उदय सामंत म्हणाले आहेत.
उदय सामंत नेमकं काय म्हणाले?
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की, मी आरक्षणासाठी अधिवेशन लावेल. 20 तारखेला अधिवेशन आहे. त्यांच्या अधिकृत सीएमओच्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. आम्ही उद्या आरक्षण घेणार आहोत, असं म्हणून विधीमंडळाचं अधिवेशन होत नाही. मला मनोज जरांगे यांना आजही विनंती करायची आहे की, स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. सामंजसपणाने भूमिका घेतली पाहिजे. उपोषणामुळे चिडचिड होत असेल. पण त्यांच्या कुठल्या वक्तव्यामुळे आम्ही नाराज आहोत, असं नाही”, अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली.