मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा आम्ही पास करत आहोत. त्यामुळे कोणाला शिव्या देऊन काय फायदा आहे? – छगन भुजबळ
मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी काढलेल्या अधिसूचनेच्या अमंलबजावणीसाठी विशेष अधिवेशन तातडीनं घेऊन त्यात कायदा पारित करावा यासाठी मनोज जरांगे १० तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत.
यादरम्यान ओबीसी समाजाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या या आंदोलनावर भाष्य केलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी केलेल्या शिवीगाळीसंबंधी देखील भुजबळांनी वक्तव्य केलं आहे.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. मागच्या दाराने त्यांना कुणबी म्हणून घुसवू नका, सगेसोयरे याची नको ती व्याप्ती वाढवू नका यासाठी आमची लढाई सुरू आहे.
त्यांना वेगळं आरक्षण द्या अशी आमची भूमिका आहे. काँग्रेसच्या काळात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एक कायदा केला गेला पण तो फेटाळला गेला. फडणवीस मुख्यमंत्री असताना केलेला कायदा हायकोर्टात टीकला पण सर्वोच्च न्यायालयात टीकला नाही. त्यातील त्रुटी कमी करण्यासाठी शुक्रे समिती आयोग त्यांनी नेमला. क्युरेटीव्ह पेटीशनसाठी तीन न्यायाधीश बसले आहेत. हे सगळे मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसं दिलं जाईल आणि ते कसं टिकेल यासाठीच बसले आहेत. याला आमचा पाठिंबा आहेच. हे १५ तारखेपर्यंत येईल असं वाटलं होतं.
कदाचित जरांगेंना वाटलं असेल १५ तारखेला येणारच आहे. मराठा आरक्षण वेगळं मिळणारचं आहे. तर आपण १० तारखेलाच उपोषणाला बसावं, म्हणजे मग श्रेय सुद्धा मिळू शकतं. त्यांची तो समज चुकीचा नाहीये. १० तारखेला उपोषणाला बसले आणि १५ तारखेला आरक्षण मिळालं की दुसरा गुलाल उधळाता येईल. पण ते काम पूर्ण नाही झालं. ते पाच-सात दिवस पुढे गेलं आहे. त्यामुळे त्यांच्या तब्येतीचा प्रश्न निर्माण झाला.
ते आता मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि मला शिव्याच देऊ लागले आहेत. ते पण आईवरून गल्लीतले लोक देतात तशा शिव्या देत आहेत. तेथील डिव्हीजनल कमिशनर, एसपी, कलेक्टर यांना देखील शिव्या दिल्या. तर त्यांनी असा त्रागा करून घेण्यापेक्षा शांत बसावं. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा आम्ही पास करत आहोत. त्यामुळे कोणाला शिव्या देऊन काय फायदा आहे?
कुणबी, सगेसोयरेच्या माध्यामून तुम्ही घुसवलं त्याविरोधात आमचा लढा रस्त्यावर आणि कोर्टात सुरूच राहणार आहे असेही छगन भुजबळ म्हणाले आहेत.
एक दिवसाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत भुजबळ म्हणाले की, एकच दिवसाचं अधिवेशन असेल आणि एकाच दिवसात ते मार्गी लागेल. कारण कोणी विरोध करेल असं वाटत नाही. भाषण करतील पण विरोध कोणी करणार नाही. कारण सर्वांची मागणी आहे की त्यांना वेगळं आरक्षण द्या. ओबीसीमधून नाही. तर वेगळं आरक्षण मराठ्यांना द्या हा तो प्रस्ताव आहे, असे भुजबळ म्हणाले. ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही. ते शक्यच नाही. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीमधून आरक्षण नाकारलं आहे.