मराठ्यांनी ५० टक्क्यांचा हक्क गमावला – छगन भुजबळ
छगन भुजबळ यांनी प्रहार केला आहे. ओबीसी आरक्षणात येऊन मराठा समाजाने नुकसान करुन घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारने काढलेला अध्यादेश म्हणजे मसुदा आहे. यावर हरकती घेता येईल.
राज्यभरातील जनतेकडून हरकती आल्यानंतर निर्णय घेतला तर न्यायालयात जाण्याचा मार्ग असणार आहे.
असे मराठा समाजाने गमावले ५० टक्के आरक्षण
सगे सोयरे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, असे माझे मत आहे. परंतु या अध्यादेशानुसार मराठा समाज ओबीसीमध्ये येत आहे. यामुळे ओबीसीमध्ये आता ८० ते ८५ टक्के लोक येतील. ओबीसीमध्ये येत असल्यामुळे मराठा समाजाने आता ईडब्लूएसमधील १० आरक्षण गमावले आहे. तसेच ओपनमध्ये ४० आरक्षण मराठा समाजाला मिळणार नाही. म्हणजे ५० टक्क्यांमध्ये मराठा समाजाला संधी होती. ती संधी मराठा समाजाने गमावली आहे. आता मराठा समाज ५० टक्के सोडून ओबीसीमधील १७ टक्क्यांमध्ये आला. ओबीसीमध्ये आधीच ३७४ जाती आहेत. त्यामध्ये मराठा समाजाला झगडावे लागणार आहेत.
शपथपत्रावर जात कशी बदलणार
एखाद्या शपथपत्राने जात बदलता येत का? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. हा प्रकार कायद्याच्या विरुद्ध होईल. मग हा नियम सर्वांना लावला गेला पाहिजे. उद्या शपथपत्र देऊन कोणीही दलितांमध्ये घुसतील. आदिवासींमध्ये घुसतील. कारण हा नियम सर्वांना लागू असणार आहे. आता ओबीसींवर अन्याय केला जात आहे की मराठ्यांना फसवले जात आहे ? असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला.
मराठा समाजाचा विजय झालंय अस तूर्त वाटतंय, परंतु प्रत्यक्षात तसे नाही. सगेसोयरे जे आहेत ते कायदाच्या चौकटीत टिकणार नाही. ओबीसीला धक्का लागणार नाही असे म्हणत मागच्या दाराने तुम्ही येत आहात. परंतु हा प्रकार म्हणजे ओबीसींवर अन्याय केला जातो का, मराठ्यांना फसवले जात आहे, यावर अभ्यास करावे लागेल, असे भुजबळ यांनी म्हटले.