क्राईम

वडिलांनी कुर्‍हाडीचे घाव घालून केली 15 वर्षाच्या मुलीची हत्या


मुलीवर कुर्‍हाडीने सपासप वार करून तिचा खून केल्याची घटना बुधवारी सकाळी वाघोली परिसरात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेनंतर पसार झालेल्या आरोपी वडीलांना अटक केली आहे. फकीरा गुंडा दुपारगुडे ( 50, रा. वाघोली, मूळ. रा, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, अक्षता फकीरा दुपारगुडे (15) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे.

बुधवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील गणेशनगर भागात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त शशिकांत बोराटे, वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काइंगडे, गुन्हे निरीक्षक सीमा ढाकणे यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. मुलीला तात्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दुपारगुडे कुटुंब मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असून कामानिमित्ताने वाघोली भागात वास्तव्यास आहेत. फकीरा हे सेंट्रींग लेबरचे काम करतात. तर, पत्नी मिळेल ते काम करते. फकीरा यांना पॅरालीसीसचा आजार आहे. बुधवारी सकाळी त्यांनी कुर्‍हाडीच्या सहाय्याने मुलीच्या डोक्यावर, हातावर वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेमागचे नेमके कारण समजू शकले नाही. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) सीमा ढाकणे पुढील तपास करत आहेत.

https://www.navgannews.in/shet-shivar-%e0%a5%a4-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0/36935/

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button