बीड : अगोदर दोन लग्न झालेल्या ४० वर्षांच्या व्यक्तीने शेजाऱ्याच्याच १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून धूम ठोकली. ही घटना परळी तालुक्यात घडली आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल होऊनही तीन महिन्यांपासून सिरसाळा पोलिसांनी मुलगी व आरोपीचा शोध लावला नाही.
अखेर व्यथीत झालेल्या कुटुंबाने बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे, असे असतानाही पोलिसांकडून याची कसलीच दखल घेतलेली नाही.
पीडितेचे वडील आणि आरोपी या दोघांची शेजारीच शेती आहे. आरोपीचे अगोदरच दोन विवाह झालेले आहेत. परंतु, तरीही त्याने शेजारीच असलेल्या १६ वर्षांच्या मुलीला आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला फूस लावून पळवून नेले. नातेवाइकांनी तत्काळ सिरसाळा पोलिस ठाणे गाठून २० ऑक्टोबर २०२३ रोजी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतरही आरोपीच्या अटकेसाठी पोलिस ठाण्याच्या पायऱ्या झिजवल्या.
परंतु, पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबाने माजलगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी, अंबाजोगाईच्या अपर पोलिस अधीक्षक यांच्याकडे धाव घेतली. त्यांना लेखी तक्रार व निवेदन दिले. परंतु, यावर कोणीही काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे पीडितेचे कुटुंब आता न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहे. बुधवारी पीडितेच्या आई – वडिलांसह चार मुले व इतर नातेवाइक यांचा उपोषणात सहभाग होता. आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असा पवित्रा या नातेवाइकांनी घेतला आहे. यावेळी ॲड. राजेश शिंदे, आण्णासाहेब मतकर, इंजि. विष्णू देवकते यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेतली.
कोरोनाचा धुमाकूळ,दिवसभर जळतायत चिता, स्मशानभूमीच्या बाहेर लागल्यात लांब रांगा