जरांगेंच्या मुंबईतील आमरण उपोषणाच्या घोषणेवर बच्चू कडूंची सडेतोड भूमिका; म्हणाले, आम्ही मनोज जरांगेंच्या सोबत आहोत
मुंबई : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आता चलो मुंबईचं आवाहन केलं आहे. त्यासाठी आंतरवालीतून मुंबईतील आझाद मैदान आणि शिवाजी पार्क इथं पायी मोर्चा काढून इथं आमरण उपोषण सुरु करणार आहेत.
जरांगेंच्या या घोषणेवर दिव्यांग विभागाचे मंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बच्चू कडू म्हणाले, आम्ही मनोज जरांगेंच्या सोबत आहोत. आंतरवाली ते मुंबई पायी मोर्चा ते काढणार आहेत, त्यात देखील आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत. मराठा समाजाचे ट्रॅक्टर जरी सरकारनं अडवले तरी त्यावेळी आपण त्यांच्यासोबत राहणार आहोत.
हिंसक आंदोलन ते करणार नाहीत हा चांगला निर्णय आहे. हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर जरब असली पाहिजे, त्यामुळं मला वाटतं त्यांनी चांगली भूमिका मांडली. एवढी मोठी ताकद त्यांच्यासोबत असताना हिंसक आंदोलन करण्याची गरज नाही.
सरकारचं शिष्टमंडळ नुकतंच त्यांच्याशी बातचीत करुन गेलं होतं. पण यानंतरही कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्यासोबत असल्याची भूमिका बजावू आणि कशा पद्धतीनं सामाजाला अधिक चांगला फायदा होईल याचा प्रयत्न करु. जरांगेंना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की पुढे कसं जायचं? असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.