२०० जेसीबी आणि हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी…; बीडमध्ये जरांगेंची तोफ धडाडणार
बीड : बीड येथे मनोज जरांगे पाटील यांची आज शनिवारी (दि.२३) दुपारी २ वाजता सोलापूर- धुळे महामार्गावरील पाटील मैदानात जाहीर सभा होणार आहे. अल्टीमेटम संपण्यापूर्वीची ही शेवटची सभा असल्याने निर्णायक इशारा सभा असे नाव देण्यात आले आहे.
या सभेला बीडसह शेजारच्या जिल्ह्यातून लाखो मराठा बांधव उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे या सभेची तयारी पूर्ण झाली असून बीडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीदरम्यान तब्बल दोनशे जेसीबीच्या माध्यमातून जरांगे यांच्यावर फुलांची उधळण केली जाणार आहे. यानंतर सभा परिसरात हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. सभेच्या परिसरात ड्रोन कॅमेर्यासह वेब कॅमेर्याची नजर राहणार आहे. दरम्यान सोलापूर- धुळे महामार्गावरील वाहतूक मांजरसुंबा व पाडळशिंगी, माजलगाव फाटा या ठिकाणाहून वळवण्यात आलेली आहे. जरांगे पाटील हे या सभेतून सरकारला काय इशारा देतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
बॅनर्स आणि कमानींनी सजले
बीडमधील जरांगे पाटील यांच्या निर्णायक इशारा सभेच्या निमित्ताने शहरात अनेक ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. तसेच जवळपास ३० हजाराहून अधिक भगवे झेंडे देखील लावण्यात आले आहेत. यामुळे बीड शहराला भगवे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मुस्लिम बांधव करणार स्वागत
बीडमध्ये जरांगे पाटील यांच्या सभेपूर्वी रॅली निघणार आहे. ही रॅली बीड शहरातील बार्शी नाका भागात आल्यानंतर या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांकडून भव्य असे स्वागत केले जाणार आहे. या ठिकाणी मुस्लीम समाजातील धर्मगुरू देखील उपस्थित राहणार आहेत.
हॉटेल्स फोडली, काऊंटर जाळले, फ्रिजमधील बांगडा खाल्ला अन् तिथेच झोपला; मात्र सकाळ झाली अन..