मथुरेतील शाही इदगाहच्या सर्वेक्षणासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाची परवानगी
प्रयागराज : मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराशेजारील शाही इदगाह परिसराचे न्यायालयाच्या निगराणीखाली सर्वेक्षण करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी परवानगी दिली. शाही इदगाहच्या सर्वेक्षणावर देखरेखीसाठी वकील, आयुक्ताची नियुक्ती करण्यासही न्यायालयाने सहमती दर्शविली.
सदर शाही इदगाह एकेकाळी हिंदू मंदिर होते हे सूचित करणारी चिन्हे असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. न्यायमूर्ती मयंक कुमार जैन म्हणाले की, १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत सर्वेक्षणाच्या कार्यपद्धतींवर चर्चा केली जाईल.
उच्च न्यायालयात सादर केलेल्या अर्जात शाही इदगाहच्या आवारात हिंदू मंदिरांचे वैशिष्ट्य असलेले कमळाच्या आकाराचे स्तंभ अस्तित्वात आहेत व हिंदू देवता ‘शेषनाग’ची प्रतिमादेखील तेथे आहे. स्तंभाच्या पायथ्याशी हिंदू धार्मिक चिन्हे आणि कोरीवकाम दिसत असल्याचेही अधिवक्ता विष्णू शंकर जैन यांनी म्हटले.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविराेधात शाही इदगाह समिती सर्वाेच्च न्यायालयात दाद मागणार आहे.