पडळकरांवरील चप्पलफेकीनंतर ओबीसी समाज आक्रमक,इंदापूर बंदचीही दिली हाक
इंदापुरात ओबीसी समाजाकडून रास्ता रोको करण्यात आले. काही वेळापूर्वी गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक करण्यात आली, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी या आंदोलकांनी केली.
तसेच जर पडळकरांवर चप्पलफेक करणाऱ्यांवर कारवाई नाही केली तर सोमवार 11 डिसेंबर रोजी इंदापूर (Indapur) बंद ठेवण्याची हाक देखील या आंदोलकांनी केलीये. इंदापुरातील संविधान चौकात ओबीसी समाजाकडून रास्तारोको करण्यात आले. आज इंदापुरात ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यानंतर दुध आंदोलनाला पडळकर भेट देण्यासाठी जात असताना त्यांच्यावर चप्पलफेक करण्यात आली. परंतु ही चप्पलफेक आम्ही केली नाही, तर त्यांच्याच माणसांनी केली, असं मराठा समाजाकडून सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे ज्यांनी ही चप्पलफेक केली त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी या आंदोलकांनी दिली.
दरम्यान गोपीचंद पडळकरांवर त्यांच्याच माणसांनी चप्पलफेक केल्याचं स्पष्टीकरण मराठा समाजाकडून देण्यात आलं आहे. तसेच पडळकरांचीच माणसंच आमच्यावर धावून आल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात आला आहे. इंदापुरात अण्णा काटे यांच्या वतीने आमरण उपोषण सुरु आहे. त्या उपोषणाला भेट देण्यासाठी पडळकर गेले असल्याची माहिती समोर आली होती. पण तिथेच दुधासाठी देखील उपोषण सुरु होते. त्यामुळे पडळकर नक्की कोणत्या उपोषणासाठी आले होते, याबाबत मात्र अद्याप संभ्रम आहे. पण आम्ही ही चप्पलफेक केली नसल्याचं मराठा समाजाने स्पष्ट केलंय.
ओबीसी एल्गार मेळाव्यातून पडळकरांचा हल्लाबोल
ओबीसीच्या हिताच्या आड कोणी येत असेल तर त्याला आडवा करायची तयारी ठेवली पाहिजे. आज सरसकट कुणबी दाखले देणे सुरू केलं आहे. अनेक जातीच्या लोकांना अनेक हेलपाटे घातले तरी आम्हाला पुरावे मागत आहेत. भुजबळ साहेबांच्या डोक्याचा केस कोणी वाकडा करु शकत नाही, असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी हल्लाबोल केला होता.