मला आईकडे जायचयं असे म्हणत २५ वर्षीय युवकाने घरात दोरीने गळफास घेत केली आत्महत्या
नागपूर : दोन वर्षांपूर्वी आईचा मृत्यू झाला. ती स्वप्नात येते, मला तिची खूप आठवण येते, मला आईकडे जायचयं असे म्हणत २५ वर्षीय युवकाने घरात नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
दुर्गाप्रसाद गोकुलप्रसाद पालीवाल (रा. गंगाबाग, पारडी) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गादास आणि त्याचा भाऊ नरेंद्र हे दोघेच वास्तव्यास होते. दुर्गादास राईसमीलमध्ये कामाला तर नरेंद्र कॅटरिंगचे काम करतो.
त्यांचे वडील आठ वर्षांपूर्वी तर आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. दुर्गादास आईच्या लाडाचा असल्याने तिच्या निधनाने त्याच्यावर मोठा परिणाम झाला. तो तणावात राहू लागला. इस्टाग्राम आणि इतर ठिकाणी तो सातत्याने आईविषयी पोस्ट करीत असे.
आईची आठवण करीत तो नेहमीच रडायचा. ‘मला आईची आठवण येते. मला आईच्या भेटीला जायचे आहे. मी आई शिवाय जगू शकत नाही.’ असे तो भावाला म्हणायचा. मागील दोन महिन्यांपासून तो कामावरदेखील गेला नव्हता.
नरेंद्र हा दहा दिवसासाठी बाहेरगावी गेला होता. यादरम्यान तो मोबाइलने दुर्गादास याचेशी बोलायचा. मात्र, दोन दिवसांपासून त्याचा दुर्गादासशी संपर्क नव्हता. शिवाय दुर्गादासचे त्याच्या मित्रांशीही बोलणे झाले नव्हते.
शुक्रवारी सायंकाळी नरेंद्र घरी पोहचल्यावर त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्याला नरेंद्रला घरी छताच्या लोखंडी हुकाला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतला. याप्रकरणी त्याचा मोठा भाऊ नरेंद्रने दिलेल्या माहितीवरून पारडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र जाधव यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.