आर्थिक संकटाशी झुंज असफल,आधी पोटच्या 3 मुलांना संपवलं, मग नवरा-बायकोनंही दिला जीव
एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह त्यांच्या घरात सापडले आहेत. पती-पत्नीचे मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळले.
तर तिथेच त्यांची तीन मुलं बेडवर मृतावस्थेत आढळून आली. मृत्यूपूर्वी कुटुंबप्रमुखाने व्हिडिओही बनवला होता. ज्यामध्ये त्याने सांगितलं, की तो आर्थिक संकटाशी झुंजत आहे. त्यांनी एका व्यक्तीचं नावही घेतलं. एक व्यक्ती मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास देत असल्याचं त्यांनी सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 7.30 वाजता ही घटना घडली. गर्नेब साब (33), त्यांची पत्नी सुमैय्या (30), मुलं हाजिरा (14), मोहम्मद सुबान (10) आणि मोहम्मद मुनीर (8) अशी मृतांची नावं आहेत. गरनेब साब यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केल्यावर ही घटना उघडकीस आली.
व्हिडिओमध्ये गर्नेब यांनी सांगितलं की, ते सध्या आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. त्यांचे कबाबचे दुकान आहे, जे घरखर्च भागवण्यास मदत करतं. पण तेही तोट्यात चाललं आहे. यासोबत त्यांनी सांगितलं की, कलंदर नावाचा एक व्यक्ती त्याला आणि त्याच्या कुटुंबाला त्रास देतो. तो त्यांना दररोज शिवीगाळ करतो आणि धमक्या देतो. या गोष्टीमुळे ते त्रस्त आहेत आणि त्यांना जगण्याची इच्छा नाही. त्या व्यक्तीने राज्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वरा यांच्याकडे न्यायाची मागणी केली आणि आरोपी कलंदरवर कारवाई करावी, असं सांगितलं.
काही लोकांनी गर्नेबचा व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घरात संपूर्ण कुटुंब मृतावस्थेत पडल्याचं दिसून आलं. गर्नेब आणि त्याच्या पत्नीचे मृतदेह लटकत होते. तर मुलांचे मृतदेह बेडवर पडलेले होते. प्राथमिक तपासात पोलिसांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, गर्नेबने आधी मुलांना विष पाजलं आणि नंतर या जोडप्याने आत्महत्या केली असावी. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू आहे.