बंदुकीचा धाक दाखवून सोने चांदीच्या दागिन्यांसह 23 वर्षीय तरुणीचे अपहरण
धुळे : जिल्ह्यातील साक्री येथे पाच ते सात दरोडेखोरांनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून सोने चांदीच्या दागिन्यांसह 23 वर्षीय तरुणीचे अपहरण केले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राहत्या घरातून तरूणीचे अपहरण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.
साक्री शहरातील सरस्वती नगरात राहणारे नीलेश पाटील हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. घरात त्यांची पत्नी ज्योत्सना पाटील व भाची एकटीच होती. ही संधी साधत काळे कपडे परिधान केलेल्या एका दरोडेखोराने दार ठोठावत, घरात प्रवेश केला. त्या पाठोपाठ चार दरोडेखोर घरात आले. ते हिंदी भाषा बोलत होते. घरात येताच चाकूचा धाक दाखवित त्यांनी ज्योत्सना पाटील यांना दागिने कुठे आहे असे विचारले. त्यांनी तिजोरीतून ८८ हजार ५०० रूपयांचे दागिने काढून घेतले. सोबत घरात असलेल्या महिलेच्या २३ वर्षीय भाचीलाही घेऊन गेले. थोड्या अंतरावर असलेल्या कारमधून त्यांनी पलायन केले. घटनेची माहिती मिळताच रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलिस उपअधीक्षक साजन सोनवणे, पोलिस निरीक्षक मोतिराम निकम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्ता शिंदे आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनीही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याप्रकरणी साक्री पोलिसात अज्ञात दरोडेखोरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.